Amol Mitkari on Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजीची लाट उसळली आहे. या नाराजीचा केंद्रबिंदू ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ठरले आहेत. नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर काल नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातही भुजबळांनी मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीवर अजित पवार गटातील नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी तर छगन भुजबळांना जाहीर आव्हान दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची काय चूक, हे एकदा भुजबळांनी सांगावं असं आव्हान मिटकरी यांनी दिलं आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात यंदा छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं. दिलीप वळसे पाटील यांचाही विचार झाला नाही. परंतु, या निर्णयानंतर छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले. प्रश्न मंत्रिपदाचा नाही पण अवहेलना झाली असे स्पष्ट करत भुजबळांना पक्षांतर्गत विरोधकांवर नाव टाळत टीका केली. काल नाशिक येथे कार्यकर्ता मेळाव्यातही त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. त्यामुळे अजित पवार गटात सध्या अस्वस्थतेचं वातावरण आहे. छगन भुजबळ यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत.
भाजपसोबत जा पण, सत्तेत राहा, कार्यकर्त्यांचा सूर; भुजबळ नक्की काय करणार?
या घडामोडी घडत असतानाच आमदार मिटकरी यांनीही भाष्य केलं आहे. मिटकरी पुढे म्हणाले, मला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं की छगन भुजबळ यांच्यासारखा नेता त्यांना आम्ही वरिष्ठ मानतो. त्यांनीच उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट करावं ही गोष्ट मनाला पटत नाही. अजित पवारांची नेमकी चूक काय हे एकदा भुजबळांनी सांगितलं पाहिजे. खरं तर छगन भुजबळ यांच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. मला वाटतं की जर त्यांची नाराजी असेल तर त्यांनी एकदम न सांगता सामंजस्याची भूमिका घेऊन सांगितलं पाहिजे, अशी अपेक्षा मिटकरी यांनी व्यक्त केली.
उपस्थितांना संबोधित करताना भुजबळ म्हणाले की, ही लढाई मी आमदार म्हणूनच सभागृहामध्ये लढणार असून, तिथे कितीही बंधने असली तरी रास्ता तो मेरा है, असा थेट भुजबळांनी अजितदादांचे नाव न घेता दिला आहे. यावेळी नाशिक लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) माझं नाव घेतलं होतं. मात्र, माझ्या विरोधात मिटिंगा झाल्या अशा खळबळजनक खुलासादेखील भुजबळांनी यावेळी केला.
मला अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत. आमचा तालुका, जिल्हा, राज्यात या असं सांगत आहेत. लासलगावमध्ये आपलं कोणीतरी गेल्यासारखी अवकळा पसरली आहे. आपल्याला पेटून उठवायचं आहे, पण पेटायचं नाही. निषेध करताना आपल्याला संयम पाळायचा आहे असं आवाहन छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये केलं आहे. यावेळी त्यांनी कोणताही निर्णय घाईघाईत घेणार नसून, घाईघाईने कोणतेही प्रश्न सुटत नाही. त्यामुळे तुमची साथ मला हवी आहे असे आवाहन भुजबळांनी उपस्थितांना केले. यापुढे आणखी संकटे येतील असे सांगत त्यासाठी पुन्हा एकदा ओबीसी एल्गार पुकारावा लागेल असे भुजबळ म्हणाले.