NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसधील (NCP) दोन्ही गट आता चांगलेच आक्रमक झाले असून एकमेकांवर घणाघाती टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असलेल्या खर्चावर वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खोचक टोला लगावला होता. दोघांच्या या शाब्दिक टोलेबाजीत आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उडी घेत रोहित पवार यांना सुनावत एक गौप्यस्फोट केला.
मिटकरी यांनी ट्विट करत रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले. दादा, आपण राजकारणात अजून लहान आणि नवखे आहात. ज्यांच्याविरुद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम आपलेच समर्थन होते. याचा मी स्वतः साक्षीदार आहे. आता सरकारला सरकारचं काम करू द्या आणि स्वतःला सावरा असे मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दादा आपण लहान आणि नवखे आहोत अजुन राजकारणात! ज्यांच्याविरुद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते याचा मी स्वतः साक्षीदार आहे.आता सरकारला सरकारचे काम करू द्या. आणि स्वतःला सावरा. https://t.co/fzMHzzTaME
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 12, 2023
याआधी रोहित पवार यांनीही आपल्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर अजित पवार यांच्यावर टीका करणारी एक पोस्ट लिहीली होती. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील, या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकून व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटलं. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारकावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर 150 कोटी खर्चासाठी, शासन आपल्या दारीच्या प्रत्येक सभेसाठी 8 ते 10 कोटी व त्याच्या जाहिरातींवर 52 कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च केले पण, अशावेळी काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची उधळपट्टी शासनाला चालते. मग नोकरभरतीसाठीच शासन एवढा बारीक विचार का करते, असा सवाल रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये विचारला होता.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च मोठा आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन-तीन कर्मचारी काम करू शकतात. राज्याचे वार्षिक बजेट साडेपाच ते सहा लाख कोटींचे आहे. त्यापैकी 2 लाख 40 हजा कोटींचा खर्च फक्त पगारावर होतो.