Cabinet expansion : ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. मात्र, सरकार स्थापन होऊन दहा दिवस उलटले तरी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार (Cabinet expansion) झाला नाही. आता उद्या (15 डिसेंबर) नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांना मंत्रीपदासाठी फोन केल्याची माहिती आहे.
हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु, ‘या’ विषयांवर होणार चर्चा, ‘मविआ’ देणार का महायुतीला आव्हान ?
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे. त्यामुळं 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षांनी मंत्रीपदासाठी आपापल्या आमदारांची नावे निश्चित केली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ आणि आदिती तटकरे यांना मंत्रिपदासाठी पहिला फोन केल्याचे वृत्त आहे. याशिवाय मंत्रिपदासाठी अनिल पाटील यांचे नावही निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तर शिवसेनेकडून उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई आणि संजय शिरसाट यांची नावं निश्चित झाल्याचं बोलल्या जातंय. मात्र याबाबत शिवसेनेने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस सरकारच्या 3.0 मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे 35 हून अधिक आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
गृह, महसूलसोबतच गृहनिर्माण, जलसंपदा मंत्रायलय भाजप आपल्याकडेच ठेवेल. राष्ट्रवादीला सहकार खाते मिळेल. कृषी मंत्रालयाबाबत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे
सेनेला कोणती खाती मिळणार?
शिवसेनेला नगरविकास, उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. या खात्याच्या माध्यमातून शिंदे यांनी सेनेच्या आमदारांना ताकद आणि निधी दिला. त्यामुळे हे खाते शिंदे यांच्या पसंतीचे मानले जात आहे.
दरम्यान, भाजपला 24 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला 11 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रीपदं मिळू शकतात. मात्र, महायुतीचे 237 च्या आसपास आमदार आहेत. त्यामुळे मंत्रिपदी कोणाकोणाला संधी मिळते, हेच पाहणं महत्वाचं आहे.