Rohit Pawar : विधानसभा निवडणुकीचं राजकारण जोरात (Maharashtra Elections) सुरू आहे. जागावाटप आणि सर्व्हेच्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. विविध सर्व्हे येत असून यातून कुणाच्या जागा घटणार कुणाच्या वाढणार याचे अंदाज बांंधले जात आहेत. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. भाजपाच्याच अंतर्गत सर्व्हेचा दाखला देत विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरल्याचा दावा त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परवाच भाजपाचा एक सर्व्हे आला आहे. यामध्ये अदितदादांच्या गटाला 7-11 जागा, शिंदे साहेबांच्या गटाला 17-22 जागा आणि भाजपाला 62-67 जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये भीती पसरलीय. यातून केंद्रीय पातळीवर अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाजपाच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी (Ajit Pawar) पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर 6 ते 7 जागा अतिरिक्त देण्याची ऑफर दिली आहे.
मनोज जरांगेंचं सोशल मीडिया रोहित पवारांकडून चालवलं जातं; राजेंद्र राऊतांचा दावा
कर्जत जामखेड संदर्भात तर कुछ भी कर के, अभी उसे वहीं पर रोको, असं सांगितल्याने कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी या ट्विटद्वारे व्यक्त केला आहे.
एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 10, 2024
दरम्यान, रोहित पवारांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपाच्या नेत्यांनी अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.