Rohit Pawar : नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिबीर सुरू झाले आहे. या शिबिरासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित आहेत. मात्र, या शिबिरात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) उपस्थित नाहीत. त्यांच्या गैरहजेरीचीच जास्त चर्चा रंगली. रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात काहीतरी बिनसल्याचं सांगितलं जाऊ लागलं. या पार्श्वभुमीवर रोहित पवार यांनी स्वतःच समोर येत सोशल मीडिया पोस्टद्वारे खुलासा केला आहे. रोहित पवार यांनी एक्स अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी शिबिराला हजर राहणे का शक्य झाले नाही, याचं कारण सांगितलं आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे.
याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये..आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय @PawarSpeaks साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मा.…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2024
शिर्डीतील शिबिराला रोहित पवार उपस्थित नाहीत. याचा खुलासा त्यांनी केला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे. याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये. आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू, असे रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रोहित पवारांची दांडी, जयंत पाटलांनी खरं सांगितलं
दरम्यान, याआधी जयंत पाटील यांनीही रोहित पवार का गैरहजर आहेत याचा खुलासा केला होता. आमदार रोहित पवार या शिबिराली उपस्थित नाहीत याबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, पक्षाचं शिबीर दोन दिवस सुरू राहणार आहे. रोहित पवार सध्या परदेशात गेले आहेत. आमचा त्यांच्याशी संपर्क झाला आहे. आज संध्याकाळपर्यंत ते येतील आणि शिबिराला उपस्थित राहतील, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या उत्तरानंतर आता रोहित पवारांच्या गैरहजेरीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.