Download App

PM मोदी – अमित शाहंचा ‘दे धक्का’ पॅटर्न; 2024 मध्ये देवेंद्र फडणवीसांना धोक्याची घंटा?

रमणसिंह, विजय बघेल, अरुण साव, ओ. पी. चौधरी यांच्यापैकी एक मुख्यमंत्री होणार. पण झाले विष्णू साय. शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, नरेंद्र तोमर, प्रदेशाध्यक्ष वी. डी. शर्मा यांच्यापैकी एक मुख्यमंत्री होणार. पण झाले मोहन यादव. वसुंधराराजे, दिया कुमारी, बाबा बालकनाथ, गजेंद्र सिंह शेखावत, अश्विनी वैष्णव, अर्जुन मेघवाल, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्यापैकी एक जण मुख्यमंत्री होणार. पण झाले भजनलाल शर्मा.

मागच्या तीन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देशभरातील पत्रकारांचे, माध्यमांचे आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवले. मुख्यमंत्री कोण होणार असा सवाल विचारला की प्रमुख नावे चर्चेत येत होती. पण घोषणा होताच चर्चेतील नावे गायब व्हायची आणि एक नवीनच नाव फ्रेममध्ये येत होते. हे याच तीन दिवसांत घडले आहे का? तर अजिबात नाही. यापूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक असेल किंवा गुजरात, गोवा, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या निवडी असतील यात या जोडगोळीचा हा पॅटर्न बघायला मिळाला आहे.

आता पुन्हा एकदा मोदी शाहंचा हाच ‘दे धक्का’ पॅटर्न देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे आणि या पॅटर्नमधून पुढचा नेम देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आहे का असा सवाल विचारला जात आहे. (New leaders as chief ministers in three states is an alarm bell for Devendra Fadnavis)

याचे कारण महाराष्ट्रातही पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच मागील चार वर्षांपासून भाजपचे नेते फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे, फडणवीस मुख्यमंत्री होणार, फडणवीसांचे मुख्यमंत्रीपदी पुनरागमन होणार असे स्वप्न आणि इच्छाशक्ती बाळगून आहेत. पण मोदी शाहंचा पॅटर्न फॉलो केला तर मनोहर लाल खट्टर, रघुवर दास, भूपेंद्र पटेल, प्रमोद सावंत, पुष्कर धामी यांच्यासोबतच आताचे विष्णू साय, मोहन यादव आणि भजनलाल शर्मा यांच्या प्रमाणेच महाराष्ट्रात देखील नवा आणि चर्चेबाहेरचा एखादा चेहरा पाहायला मिळू शकतो असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत.

मोठी बातमी : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घ्या, हायकोर्टाचे आयोगाला आदेश

भाजपकडून नव्या नेतृत्वाची तयारी

गेल्या काही वर्षांपासून भाजप मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुका लढवता दिसून येत आहे. याआधी भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर ठेवून निवडणुका लढवत होता. मात्र, गेल्या काही निवडणुकांपासून बदल करण्यात आला आहे, आता निवडणुकांच्या निकालांनंतर सर्व बाबींचा बारकाईने आढावा घेत मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर केले जात आहे. यात नव्या चेहऱ्याच्या कामगिरीपासून ते व्होट बँक आणि रिपोर्ट कार्डपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे. या सर्व गोष्टी पाहता भाजपकडून येणाऱ्या भविष्यातील राजकारणासाठी नव्या नेतृत्त्वाची तयारी केली जात असल्याचे अधोरेखित होत आहे.

 2014 पासूनच सुरुवात :

यापूर्वी देशातील काही राज्यांमध्ये भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी देण्यास सुरूवात केली आहे. याची सुरूवात 2014 मध्ये मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर झाली. त्यावेळी हरियाणाच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात मुख्यमंत्रीपदासाठी जाट समाजातून येणाऱ्या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, संधी देण्यात आली ती गैर-जाट नेते मनोहर लाल खट्टर यांना. भाजपची ही खेळी यशस्वी ठरली आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. यानंतर दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाशी युती करत खट्टर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.

त्याचवेळी महाराष्ट्रातीलही निवडणूक पार पडली होती. यात भाजपने दमदार यश मिळाले. मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा चालू होती. चर्चेत गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवर अशा नेत्यांची नावे आघाडीवर होती. पण मोदी-शाहंनी धक्कादायकरित्या देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली. बहुसंख्य मराठा समाज असलेल्या महाराष्ट्रात ब्राह्मण असलेले फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर फडणवीसांनी मागे वळून पाहिले नाही. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि इतर सर्व निवडणुकांमध्ये भाजपाल यश मिळवून दिले. लोकसभेत 42 जागा निवडून आल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांनी जेरीस आणले.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी; कांदा निर्यात बंदीवरून तांबेंचा निशाणा

2014 मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आनंदीबेन पटेल यांना संधी देण्यात आली. त्यानंतर ऐन निवडणुकांच्या तोंडावर सप्टेंबर 2021 मध्ये भूपेंद्र पटेल यांना नेत्याला संधी दिली. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पटेलांनी केंद्राशी ताळमेळ साधत सरकारला चांगल्या पद्धतीने हाताळले. ज्या पद्धतीने हरियाणा, गुजरातमध्ये नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून बसवण्यात आले, त्याच पद्धतीने गोव्यातही दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपने नव्या चेहऱ्याला संधी देत 2019 मध्ये प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री केले. पक्षाची ही चाल यशस्वी ठरली आणि 2022 च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आणि सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

वरील तीन राज्यांप्रमाणे भाजपनं उत्तराखंडमध्येही चर्चेतील नावांना बगल देत मुख्यमंत्रीपदावर नव्या चेहऱ्याला संधी दिली. भाजपने 2021 मध्ये उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला होता.त्यानंतर राज्यात घडलेल्या अनेक घटनांकडे कानडोळा करत भाजपनं 2022 च्या निवडणुकांनंतर पुन्हा धामी यांच्यावर विश्वास टाकत त्यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान केले. याच पॅटर्ननुसार आता महाराष्ट्रातही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकरी, विद्यार्थी, कामगार अशा सर्व पातळीवर फीट बसेल अशा एखाद्या नेत्याची निवड केली जाऊ शकते असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

follow us