Nitesh Rane on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आमच्या जीवावर खासदार झाले असं शिंदे गटाच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं. मात्र, आता या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी संजय राऊत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. दरम्यान, यावरून आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राऊतांवर जोरदार टीका केली. राऊतांची लायकी सरपंच निवडणुकीची आहे, आधी ती लढवा, अशा शब्दात त्यांनी राऊतांची खिल्ली उडवली.
राऊतांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिल्यावर आमदार राणे म्हणाले की, संजय राऊत म्हणतात की, जर पक्षाने आदेश दिला तर मी ईशान्य मुंबईची लोकसभेची जागा लढवेन. हा फार मोठा विरोधाभास आहे. कारण, ज्या वॉर्डमध्ये संजय राऊत यांचे घर आहे. त्या वॉर्डचा नगरसेवक कॉंग्रेसचा आहे. जो माणूस स्वतःच्या वॉर्डमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून उबाठाचा नगरसेवक निवडून आणू शकला नाही, तो लोकसभेची भाषा करत आहे. तुमची लायकी ही सरपंच निवडणुकीची आहे. आधी सरपंच पदाची निवडणूक लढवा आणि तिथे तुमचं डिपॉझिट राहतंय का ते बघ, अशा शब्दात नितेश राणेंनी राऊतांवर टीका केली.
पवार साहेब श्रद्धास्थानीच…! वक्तव्याचा विपर्यास केला; माध्यमांवर घसरत वळसे पाटलांची दिलगीरी
राणे म्हणाले, ईशान्य मुंबईची जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. मी वारंवार सांगितलं की, राऊत हे शरद पवारांसोबत जाणार. हेच आता सत्य होताना दिसत आहे. ते लवकरच शरद पवाराच्या गटात जाऊन बसणार आहेत आणि तिथून निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा निवडणूक जर लढवायची खाज असेल तर रत्नागिरी-सिंधूदुर्गमध्ये या. मग तुमचं डिपॉझिट राहतय का? हे आम्ही पाहू, असं आव्हानही राणेंनी राऊतांना दिलं.
शिवसेना-भाजपच्या पहिल्या युतीपासून ईशान्य मुंबई लोकसभेची जागा नेहमीच भाजपच्या खात्यात गेली. किरीट सोमय्या हे तिथले माजी खासदार आहेत. 2019 मध्ये भाजपने उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांना लोकसभेसाठी उमेदवारी देऊ नये, अशी अट भाजपला घातली. भाजपने ही अट मान्य केली. सोमय्यांच्या जागी मनोज कोटक यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा लढवली आणि ते विजयी झाले. मात्र, आता ठाकरे आणि भाजपमध्ये दरी निर्माण झाल्यानं सोमय्या पुन्हा एकदा ईशान्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मागू शकतात. अशातच आता संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचे समोर आले आहे. तसे झाल्यास लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईच्या जागेवर संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.