Vinod Tawde : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (MVA) दारुण पराभव केल्यानंतर आज शिर्डीमध्ये (Shirdi) भाजपकडून (BJP) राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना भाजप नेते आणि राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिले.
यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, निवडणुकीत जिंकणं हा उद्देश नाही तर या महाराष्ट्रासाठी काय तरी करून दाखवायचं आहे हे आपला लक्ष्य आहे. आज विरोधक अस्तित्वाची लढाई लढत आहे. विरोधकांना 2014 मध्ये इतका मोठा विजय मिळेल असं वाटलं नव्हतं तसेच 2019 मध्ये आपण पुन्हा येऊ असं देखील त्यांना वाटलं नव्हतं. 2024 मध्ये जागा कमी करून विरोधक खुश झाले होते मात्र हरियाणा आणि महाराष्ट्रात पराभव झाल्यानंतर पुन्हा विरोधक या देशातून राज्यातून भाजपची विचारधारा संपवण्याचा काम करत आहे. अशी टीका या अधिवेशनात बोलताना विरोधाकांवर भाजप नेते विनोद तावडे यांनी केली.
पुढे बोलताना विनोद तावडे म्हणाले की, विरोधक आज पक्ष म्हणून निवडणूक लढवत नाही. मतदानासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुस्लिमांकडे लोटांगण घालणार असं कधी वाटले होते का? असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लावला. तसेच भाजप विरोधात आज सर्वशक्ती एकत्र येत आहे आणि भाजपचा विजयरथ थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. असेही यावेळी विनोद तावडे म्हणाले.
आज फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर भाजपची सदस्य संख्या 11 कोटीवर आहे. असं देखील यावेळी ते म्हणाले. याचबरोबर खासदारपासून सरपंचपर्यंत सर्वांनी पुढील आठ दिवसात सदस्य वाढवण्यासाठी काम करा असा आवाहन देखील यावेळी त्यांनी केला.
धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार? विचारताच अजित पवार भडकले; म्हणाले, तुझं नाव…
तसेच देशात भाजपकडून संविधान सम्मान अभियानाची देखील सुरुवात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या अभिनयाअंतर्गत लोकसभा निवडणुकीत ज्या लोकांनी संविधानाचा चुकीचा वापर केला. ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्या लोकांविरोधात घराघरात जाऊन लोकांना माहिती द्या असं आवाहन देखील या अधिवेशनात भाजप महामंत्री विनोद तावडे यांनी कार्यकर्त्यांना केला.