Download App

पटोले-थोरातांची एकत्र परिषद : ‘कॉंग्रेसमध्ये कोणतेही वाद नाहीत, कॉंग्रेस एकसंघ’

  • Written By: Last Updated:

मुंबई : काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला सुप्त संघर्ष विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून झालेला गोंधळ आणि त्यानंतर होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून वाद शिगेला पोहोचला होता. काँग्रेसमधील काही नेते नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वावर नाराज असून, बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) थेट काँग्रेस नेतृत्वाकडे तक्रार करत थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. परंतु पक्षाने त्यांचा राजीनामा नामंजूर केला. दरम्यान, आज नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद (A joint conference of Patole-Thorat) घेतली. यावेळी नाना पटोले यांना थोरांतासोबत मनोमिलन झालं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले आणि थोरात या दोन्ही नेत्यांनी उत्तर दिली.

बाळासाहेब थोरात यांच्या कथित नाराजीनाट्य व नाराजीपत्रावर प्रश्न विचारले असता, पटोले म्हणाले, मी तेच तुम्हाला विचारतोय की, थोरातांच्या नाराजीपत्राची एक तरी कॉपी दाखवा. बाळासाहेब नाराज नाहीत. असं कोणतंही पत्र नाही. तुम्हीच दाखवत होतात की ते नाराज आहेत मात्र, तशी परिस्थिती नाही.

पटोले – थोरात वादावर बोलतांना पटोले म्हणाले, पक्षांतर्गत काही गोष्टी होत असतात. त्या मोठ्या करण्याची गरज नाही. थोरात साहेब आणि माझ्यामध्ये कोणतेही वाद नाहीत. आम्ही एकत्र आहोत, म्हणजेच आमच्यात वाद नाहीत. काँग्रेस एकसंघ असल्याचंही यावेळी पटोले यांनी सांगितले. मात्र, नागपूर, अमरावती विधानपरिषद निवडणुकीतील पराभवाकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी भाजपने काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पटोले यांनी केला.

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून मावळते राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांचं कौतुक, क्लिप व्हायरल

दरम्यान पत्रकारांनी बाळासाहेब थोरात यांना नाराजीबाबत प्रश्न विचारला. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले की, मी नाराज होतो, हे कोणी सांगितले? मला माध्यमांकडूनच समजत आहे की मी नाराज होतो. मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही आहे. तसेच पत्रव्यवहार हा प्रत्येक संघटनेत चालतो. तो मीदेखील केला, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

प्रत्येक संघटनेत अनेक प्रश्न असतात. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे याच्यासोबत बसून चर्चा करावी, असे मत एच.के. पाटील यांचे आहे. त्यामुळे चर्चा होईल. काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा होईल. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

विशेष म्हणजे अतिशय हसत-खेळत आणि उत्साहाच्या वातावरणात ही पत्रकार परिषद पार पडली. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांना महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वादावर पडदा पाडण्यात यश आल्याचं चित्र आहे.

या पत्रकार परिषदेत पटोले यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केले आहे. पुण्याची पोटनिवडणुक, काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस, अदानी प्रकरण इत्यादी प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया देत, तसेच मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी पटोले म्हणाले, ‘आज केंद्र सरकारच्या यंत्रणांकडून पत्रकांवर, माध्यमावर दडपशाही केली जात आहे. पत्रकारांच्यावर होणारा हल्ल्याविरोधात काँग्रेस आवाज उठवणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. अदानीच्या घोट्याळ्यामुळे एलआयसी, सीबाआयमधील लोकांची पैशांची गुंतवणूक धोक्य़ात आली आहे, असे पटोले म्हणाले.

 

Tags

follow us