Jaykumar Gore : अश्लील फोटो प्रकरणी अडचणीत आलेले मंत्री जयकुमार गोरे पु्न्हा चर्चेत (Jaykumar Gore) आले आहेत. बीडप्रमाणेच माझ्याविरोधात कट रचला जात होत. पण मला आधीच माहिती मिळाल्याने मी पुरावे गोळा केले आणि वाचलो असा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या कटात अनेकजण सहभागी आहेत. या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत त्यामुळे मी यावर कोणतेही वक्तव्य करणार नाही. पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व पुरावे आणि माहिती समोर आणणार आहे, असा इशाराही मंत्री गोरे यांनी केला.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री गोरे बोलत होते. गोरे पुढे म्हणाले, माझ्याविरुद्ध जो काही कट रचला जात होता त्याची ऑडीओ क्लीप माझ्याकडे आहे. यात बीडची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न होता. एखाद्याला कायमचं संपवायचं आणि माझ्यावर घालायचं असाही प्रयत्न यात केला गेला होता. या सगळ्यात अनेक मोठी लोकं सामील आहेत. आताही माझ्या मोबाइलमध्ये पुरावे आहे. पण पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे यावर मी आत्ता काहीच बोलणार नाही.
कितीही काळ्या बाहुल्या बांधा माझं कुणीही वाकडं करू शकत नाही, देवाभाऊ.. जयकुमार गोरेंचा इशारा कुणाला?
जन्मल्यापासून मरेपर्यंत जे काही हवं असतं ते सगळं ग्रामविकास खात्याकडे आहे. अनेक जण शेतकऱ्यांचे नेते झाले पण त्यांनी शेतकऱ्यांचे कुठलेच प्रश्न सोडवले नाहीत. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार आलं आहे. ज्या पालखीत जाण्यासाठी मी तडफड करत होता त्याच पालखीचं नियोजन करण्याची संधी मला मिळाली. मी आमदार होऊ नये मंत्री होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्रासही दिला. पण मी आमदार आणि मंत्रीही झालो. खरंच मर्दाची औलाद असाल तर समोर येऊन लढा असे आव्हान मंत्री गोरे यांनी दिले.
माझा जन्म दुष्काळी गावात झाला. मी कधीही पाण्याला नाही म्हणणार नाही. पाणी नीट वापरा. मी माझ्या राजकीय जीवनात एकदाही मंत्रिपद मागितलं नाही. कुठलं खातंही कधी मागितलं नाही. मी काही न मागताच मला देवेंद्र फडणवीसांनी थेट मंत्रिपदच दिलं असेही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यावेळी म्हणाले.