जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर (Solapur) सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं असून चक्क पालकमंत्र्यांनीच गंभीर आरोप केल्याने, आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. माळशिरसमधील भाजप नेते राम सातपुते यांची हत्या करण्याचा कट होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे, असे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. तर, त्यास राम सातपुते यांनी दुजोरा देत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गटातील काही लोक असल्याच पुढे म्हटलं. त्यावरुन, आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी पलटवार केला आहे.
एकतर माळशिरस तालुक्याचा निकाल 9 पैकी 7 जिल्हा परिषदा आम्ही जिंकल्या आहेत. सातपुते यांनी मीडिया मॅनेजमेंट करून एक जागा निवडून आणली, निवडणूक आली अन् पराभव झाला की ते वेगळ्या विचारात जातात आणि प्रसिद्धी झोतात ठेवण्यासाठी कोणत्याही स्तराला जातात, असा पलटवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. राम सातपुते हे कोणत्याही स्तराला जाऊन कोणतीही बातमी देतात. माढा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पालकमंत्र्यांना पूर्ण अपयश आले म्हणून दोघेही वैफल्यग्रस्त झाले आहेत. म्हणूनच, कामापासून लक्ष विचलित करणे, चुकीच्या दिशेने लोकांना घेऊन जायचं हे त्यांचं नेहमीच आहे.
मुर्दाड माणसाला कोण मारणार? उत्तम जानकरांनी उडवली राम सातपुतेंच्या हत्येच्या आरोपांची खिल्ली
निवडणूक आल्यावर सपाटून आपटतात, म्हणून दरवेळेस त्यांच्या बुद्धीवर गंज चढतो आणि मग कोणत्याही स्तराला जातात, अशी टीका धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे. मतमोजणीच्या वेळेस सगळ्या पक्षाचे समर्थक एका जागेवर उभे असतात. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या लोकांना दूर ठेवले पाहिजे. मतमोजणीच्या वेळेस राम सातपुते तिथे गेले आणि त्यांनी आमच्या माने नावाच्या उमेदवाराच्या तोंडावर गुलालाची गन मारली, म्हणून तिथं गोंधळ झाला. मात्र, राम सातपुते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोणत्याही स्तराला जातात. सातपुतेंच्या पत्नीच्या विरोधात आमच्या कुटुंबातील उमेदवार देऊन त्यांना तिथेच अडकून ठेवण्याचं आमची व्यवहरचना होती, त्यात आम्हाला यश मिळाले, असंही धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं.
उमेश पाटील शब्दाचे पक्के असतील आणि संन्यास घेणार असतील तर त्यांनी सौंदत्तीला जावं. मोहोळ तालुक्यात भाजपला मिळालेलं यश जे नरेंद्र मोदी, फडणवीस आणि जयकुमार गोरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून जनतेने दिलं आहे. उमेश पाटील यांनी आता तरी त्यांनी शहाण व्हावं, मोहोळ तालुका सुसंस्कृत तालुका आहे. खोटी आश्वासन देणे, टीका टिपन्नी करणे मान्य नाही, हा जनतेने दिलेला संदेश आहे. उमेश पाटील हे शब्दाचे पक्के असतील आणि संन्यास घेणार असतील तर मोहोळचे महंमद आहेत. त्या महंमदाकडून ड्रेस देतो, ते ड्रेस घेऊन त्यांनी सौंदत्तीला जावं, हा मी त्यांना सल्ला देतो, अशा शब्दात राजन पाटील यांनी उमेश पाटलांवर टीका केली.
