मुंबई : ‘दावोस दौऱ्यात अनेक उद्योजकांबरोबर बैठका झाल्या. प्रत्येकाने पंतप्रधानांबद्दल जो आदर व विश्वास व्यक्त केला. ते आमचे नेते व मार्गदर्शक आहेत याचा अभिमान तर आहेच, पण एक भारतीय म्हणून अभिमान वाटला.’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मिळालेल्या गुंतवणुकीविषयी माहिती दिली. ते मेट्रो उद्घाटनासाठी आणि जाहीर सभेसाठी मुंबईत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यावर मोदी देखील बोलले. ‘एकनाथ शिंदेंना डाव्होसमध्ये जे दृष्य दिसलं ते खरं होतं. भारताच्या सामर्थ्याचा अंदाज आता जगाला आला आहे. एक प्रकारची सकारात्कमकता देशात आली आहे.’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदेंच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. मेट्रो उद्घाटनासाठी आणि जाहीर सभेसाठी मुंबईत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात हे विधान केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगानं धाऊ शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यासोबत आहे. केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहेच, येणाऱ्या काही दिवसात महापालिका निवडणुका होतायत, तेव्हा विकासाचे हे डबल इंजिन ‘ट्रिपल इंजिन’ होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
त्याचबरोबर मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, मुंबईकरांचं जगणं सुसह्य करण्याची सुरूवात आहे. येत्या दोन वर्षांत त्याचा कायापालटही पहायला मिळेल आणि आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते ऑक्टोबर 2015 मध्ये मेट्रोचे भूमिपूजन झाले होते. त्यांच्याच हस्ते आज उद्घाटनही होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प झाला होता. लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता. त्यातून या राज्याची आणि जनतेची सुटका करण्याची भाग्य मला मिळाले ते आदरणीय मोदीजी सारख्या धाडसी नेत्यामुळेच असे मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितले.
हा मुंबईकर मुंबईच्या बाहेर जाऊ नये याला आमचं प्राधान्य आहे. सर्वसामान्य मुंबईकर माणसाला स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत यासाठी घरांच्या विविध योजना आम्ही राबवतो आहोत. पुनर्विकासाला ती आणतो आहोत, पोलिसांना, कामगारांना घरे देत आहोत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकासाचे उदाहरण दिले.