गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार कोण यावरुन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरु आहेत. (Munde) त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या करुणा मुंडे शर्मा यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राजकारणात पोटचा नव्हे तर विचारांचा वारसा असतो. हे धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडे हेच आहेत, असे विधान करुणा शर्मा यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता यावर मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश महाजन काय म्हणाले?
क्या जमाना आ गया, स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवत आहे, एक भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते. स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा मग तो सामाजिक असो किंवा राजकीय असो, फक्त आणि फक्त माझी पंकू ताई , दुसरे कोणी नाई, असे प्रकाश महाजन म्हणाले.
दरम्यान बीडमधील ओबीसींच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस धनंजय मुंडे हेच आहेत. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी त्यांनी काम करावे, असे म्हटले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्यात. त्यातच याच विषयावरून करूणा मुंडे यांनी भाष्य करत चक्क धनंजय मुंडे यांचे कौतुक केले. त्यांच्या राजकीय संघर्षाचे आपण साक्षीदार आहोत, 2009 ते 2019 दरम्यान, धनंजय मुंडे यांनी जो संघर्ष केला, त्यात मी ही होते, असे करूणा मुंडे म्हणाल्या.
छगन भुजबळ यांनी 100 टक्के सत्य सांगितलं आहे. राजकारणामध्ये पोटचा वारसा नसून तो विचारांचा वारसा असतो आणि आज ते धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. घरामध्ये वाद झाला होता, मात्र धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंसारखच तळागाळामध्ये जाऊन स्वत:चे व्यक्तित्व निर्माण केलं. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा खरा राजकीय वारस हे धनंजय मुंडेच आहेत आणि त्यांची सून म्हणून मी सुद्धा. धनंजय मुंडे यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं, असेही करूणा मुंडे यांनी म्हटले.
पंकजा मुंडेंना हरवण्यामध्ये भाजपाचा हात होता. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण झालं. त्यावेळी पंकजाताई डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी एक भाऊ म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. यानंतर दोघा बहीण भावांनी एकत्र मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांचा आणि माझा काही वाद नाही, त्यांच्या वृत्तीचा आणि माझा वाद आहे, असेही करुणा मुंडेंनी म्हटले होते. त्यातच आता प्रकाश महाजन यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.