Manoj Jarange Patil : जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज विराट सभा घेतली. या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलकांनी हजेरी लावली होती. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतली आहे. तर वकील गुणरत्न सदावर्तेंनी (gunratna sadavarte) जरांगे पाटलांना अटक करावी, अशी मागणी केली. यावरून जरांगे पाटलांनी भुजबळ आणि सदावर्तेंवर जोरदार निशाणा साधला. भुजबळ आणि सदावर्तेंना फडणवीसांनी समज द्यावी, असं विधान त्यांनी केलं. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी भाष्य केलं.
IAS बालाजी मंजुळे : धडाकेबाज अधिकाऱ्याच्या ‘हिरो ते झिरो’ प्रवासाची गोष्ट
जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, आणि मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करावा, ह्या मागण्या केल्या. मात्र, त्यानंतर अनेक ओबीसी नेत्यांनी जरांगेंच्या मागणीला विरोध केला. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना आरक्षण द्या, पण ते कुणबीतून देऊ नये. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र, मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. मराठ्यांना कुणबीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी ते करत आहेत. त्यामुळं सरकारची चांगलीच कोंडी झाली.
यावरून भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दीक चकमकही झाली. तर गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटलांना अटक करावा, अशी मागणी केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलतांना जरांगेंनी फडणवीसांनी भुजबळ आणि सदावर्तेंना समज द्यावी, सदावर्तेंचे मालक कोण आहेत, हे सगळ्यांना ठाऊ आहे, असं विधान त्यांनी केलं.
दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी एक ट्वीट करत जरांगेंवर टीका केली. जरांगेंच्या आडून त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. दरेकरांनी लिहिलं की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही, हे अवघ्या जगाला ठावूक आहे. पण, तरीही असा प्रचार शरद पवार गटाकडून नेहमीच केला जातो. आता तीच भाषा जर जरांगेंच्या तोंडून येत असेल तर ते कुणाच्या सांगण्यावरुन हे बोलत आहेत, अशी शंका येते. कुणाच्या राजकीय बंदुकीला त्यांनी आपला खांदा वापरु देऊ नये, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं ट्वीट दरेकरांनी केलं.
गेल्या काही महिन्यांपासून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. मात्र, सरकारने अद्याप मराठा आरक्षणासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही.अशाचत मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडी पवारांची भाषा असल्याचं दरेकर म्हणाले. यावर आता शरद पवार गट काय प्रतिक्रिया देतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.