IAS बालाजी मंजुळे : धडाकेबाज अधिकाऱ्याच्या ‘हिरो ते झिरो’ प्रवासाची गोष्ट

IAS बालाजी मंजुळे : धडाकेबाज अधिकाऱ्याच्या ‘हिरो ते झिरो’ प्रवासाची गोष्ट

मुंबई : घरी अठरा विश्व दारिद्र्य, वीज नाही, घड्याळ नाही, पुरेसे कपडे नाहीत, एक डोळा निकामी अशात सात भावंडं. अशा डोंगराएवढ्या संकटांवर मात करत दगडफोड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत मागास अशा वडार समाजातून येत सोलापूरचे बालामी मंजुळे (Balaji Manjule) आयएएस (IAS) झाले. अवघ्या महाराष्ट्राचे हिरो ठरले. आंध्रप्रदेश, तेलंगणामध्ये काम करताना महाराष्ट्राचा झेंडा सतत फडकवत ठेवला. पण आता हेच बालाजी मंजुळे पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात नंदुरबारमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दोन-पाच रुपयांची नाही तर तब्बल १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे हिरो ते झिरो अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. पाहुयात हे नेमके प्रकरण काय आहे? (case has been registered against IAS Balaji Manjule for cheating the government)

प्रकरण सविस्तर समजून घेण्याआधी बालाजी मंजुळे कोण आहेत हे बघणं महत्वाचं ठरतं.

कोण आहेत बालाजी मंजुळे?

बालाजी मंजुळे मूळचे जेऊर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील रहिवासी. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यात लहानपणी एकदा आई-वडिलांना मदत करताना बालाजी यांचा डोळा अपघातात निकामी झाला होता. मात्र अशा अपंगत्वावर लिलया मात करत त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवलं. त्यांनी गाठलेले यशोशिखर पाहून अनेकांनी त्यांचा उल्लेख “दगडखाणीतील हिरा’ असाच केला. शाळेतील स्पर्धांमध्ये मिळालेल्या बक्षिसाची रक्‍कम आईच्या हातावर ठेवताना ती नेहमी म्हणत, “तुला कलेक्‍टर होऊन देशसेवा करायची आहे’. आईचे हे शब्द खरे ठरवत ते केलक्टर झाले.

रेल्वे पोलिसांची धडाकेबाज कारवाई! उपराजधानीत 9 किलो सोनं जप्त; दोघं पोलिसांच्या जाळ्यात…

2009 मध्ये बालाजी मंजुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५६ वे आणि महाराष्ट्रात तिसरे आले. तर राज्यशास्त्र विषयात त्यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर त्यांची आंध्र प्रदेश केडरमध्ये नेमणूक झाली.आंध्र प्रदेशमध्ये काम करताना मंजुळे यांनी स्वच्छता मोहीम, आदिवासी व गरजूंच्या भूमी वाटप, अपंगांना घरे, पूर व्यवस्थापन, हैदराबाद येथे जागतिक कृषी परिषदेचे काम, चित्तूर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाचे काम उल्लेखनीयरित्या पूर्ण केले. पुढे आंध्र-प्रदेश आणि तेलंगणा ही दोन राज्ये स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना तेलंगणामध्ये पाठविण्यात आले. तिथेही त्यांनी चांगले काम केले.

मिळालेल्या केडरमध्ये १० वर्षे काम केल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती मिळाली. २०१९ मध्ये ते महाराष्ट्रात आले. अन् इथूनच त्यांच्या हिरो ते झिरो अशा प्रवासाला सुरुवात झाली.

मंजुळे यांना सुरुवातीला अपंग कल्याण आयुक्त म्हणून पदभार सोपवण्यात आला. एका दिव्यांग अधिकाऱ्याला अपंग कल्याण आयुक्तपदाची जबाबदारी दिल्याने चांगलीच चर्चा झाली. पण अवघ्या पावणे दोन महिन्यांतच त्यांची बदली झाली. त्यांना नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी पाठविण्यात आले. पण मंजुळे यांची पाचच महिन्यांत पुन्हा बदली करून त्यांना पुण्यातल्या आदिवासी प्रशिक्षण संस्थेत पाठवण्यात आलं. तिथूनही त्यांची दोनच महिन्यांत पुन्हा बदली होऊन त्यांना नियोजन विभागात उपसचिव पदावर रुजू होण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर ते तेलंगणात परत गेले.

आपल्या अल्पकाळात त्यांच्या सतत बदल्या होतं राहिल्या. कधी वादग्रस्त निर्णय, कधी निर्णयातील दिरंगाई, प्रशासनात आलेला आळस तर कधी पुढाऱ्यांशी न पटणे अशा गोष्टी त्यांच्या बदलीला कारणीभूत ठरल्या. याच दरम्यान नंदुरबारमध्ये कार्यरत असताना अनेक प्रकरणांमध्ये अनियमितता करुन १० कोटी ८२ लाख रुपयांच्या महसुलाचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदे अन् अजितदादांनी सुरु केली तयारी; फडणवीसांच्या शिलेदाराची ‘कोंडी’

२२ फेब्रुवारी २०१९ ते १८ जुलै २०१९ या कालावधीत मंजुळे नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. या दरम्यान, शासनाने दिलेली महसुली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनधिकृत बिनशेती, भोगवटदार अशा एकूण १६ प्रकरणात सहायक जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडून मूल्यांकन अहवाल न घेता नजराना अभिमूल्य रक्कम निश्चित करुन किंवा इतर अनियमितता करुन शासनाचे एकूण 10 कोटी ८२ लाख ६४ हजार २२० रुपये एवढे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका मंजुळे यांच्यावर आहे.

याशिवाय इतर चार प्रकरणांमध्ये शासकीय नियम अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. यात काही नमूद प्रकरणात आदेश देण्याचे किंवा मंजुरी देण्याचे सर्वतोपरी अधिकारी शासनाचे असतात, याची सुरुवातीपासून जाणीव असतानाही स्वत:च्या स्वाक्षरीने सदरचे आदेश देणे, संबंधित प्रकरणांची नोंदवहीत त्याच क्रमांकाने इतर प्रकरणे नोंदविली गेली असतानाही बनावट दस्तांवर तेच क्रमांक नोंदविणे असाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याबाबत शासनाच्या वतीने महसूल महसूल तहसीलदार अनिल गवांदे यांनी याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंजुळे यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस आता अधिकचा तपास करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube