पुणे : कसबा व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. कसबा विधानसभेसाठी भाजपचे हेमंत रासने व महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर या दोेघांमध्ये जोरदार टक्कर आहे. मतदानाच्या नऊ फेऱ्यांमध्ये रवींद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत.
आत्तापर्यंत रवींद्र धंगेकर 34778 मते मिळाली आहेत. तर हेमंतर रासने यांना 30272 मते मिळाली आहेत. नवव्या फेरीत धंगेकरांना 4506 मते मिळाली आहेत. नवव्या फेरीमध्ये देखील धंगेकर यांचा लीड वाढल्याने हेमंत रासने यांना हा धक्का मानला जात आहे. या फेरीमध्ये रासने यांना तीन हजारांच्या आसपास मते या नवव्या फेरीमध्ये मिळाली आहेत. कसबा विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणी गेली 25 वर्षे भाजपचा आमदार निवडूण आलेला आहे. पण यावेळी मात्र बदल होईल, असे धंगेकर म्हणाले आहेत.
तर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांना आत्तापर्यंत फक्त 100 मते मिळाली आहेत. ब्राह्मण समाजाला उमेदवारी न दिल्याने दवे यांनी फॉर्म भरला होता. या निवडणुकीत ब्राह्मण समाज नाराज असल्याचे देखील बोलले जात होते. दरम्यान रासने यांना नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमध्ये अपेक्षित मते मिळालेली नाही आहेत. याठिकाणी देखील धंगेकर आघाडीवर आहेत.
तसेच पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत जगताप यांना 28727 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 23710 मते मिळालेली आहेत. तर राहुल कलाटे यांना 10048 मते मिळालेली आहेत.