Radhakrishna Vikhe : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला. तर ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ लक्ष्मण हाकेंही आक्रमक झालेत. त्यामुळं सरकारची कोंडी झाली. दरम्यान, आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंनी (Radhakrishna Vikhe) मनोज जरांगेंवर जोरदार टीकास्त्र डागलं. जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं.
राधाकृष्ण विखे हे आज नांदेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, आरक्षणाबाबत सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रत्येक पातळीवर काम करत आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, या दोन्ही समाजाच्या आरक्षणावर सरकार तोडगा काढेल, असे विखे पाटील म्हणाले.
अंतराळातून घरावर कचरा पडला! NASA वर 80,000 डॉलर्सचा दावा ठोकला…
यावेळी त्यांनी मनोज जरांगेंना देखील चांगलंच फटकारल. ते म्हणाले, आरक्षणाचे आंदोलन आता भरकटत चालले आहे. आंदोलनाला गांभीर्य राहिलं नाही. जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे, असं नाही. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, बाकी या समाजासाठी काम करणारी लोकं भरपूर आहेत. आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंड वर काम करणारे कार्यकर्ते आहोत, असं विखे म्हणाले.
सुजय विखे यांचा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंकेंनी पराभव केला. हा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. दरम्यान, त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी केली. याविषयी विचारले असता विखे म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सुजयने हा निर्णय घतेला. आम्ही काम केल्यानंतर असे निकाल येत असतील तर पडताळणीची मागणी करावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यामुळं सुजयने व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केल्याचं विखे म्हणाले.