Nana Patole Meet’s Rahul Gandhi In Surat : मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात राहुल गांधींना (Rahul Gandhi) दोन वर्षांची शिक्षा सुरत न्यायालयाने सुनावली आहे. आज या प्रकरणावर सुरत न्यायालयात (Surat Court) सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला आहे. शिक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर पुढील सुनावणी 3 मे रोजी पार पडणार आहे. यात न्यायालय नेमकं काय निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राहुल गांधीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून काँग्रेसचे नेते सुरतकडे रवाना झाले होते. यामध्ये प्रामुख्याने आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा समावेश होता. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक फोटो समोर आला आहे. यात ते सुरत येथे राहुल गांधींशी अगदी निवांतपणे भेट घेत चर्चा करताना दिसत आहेत.
कालच मविआची ‘व्रजमुठ’ छत्रपती संभाजीनगर येथे सभा पार पडली. यात नाना पटोले यांनी तब्येतीचे कारण देत सभेला दांडी मारली होती. त्यांच्या या अनुपस्थितीमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. पटोले मविआमध्ये नाराज असल्याने त्यांना सभेला उपस्थिती लावली नव्हती अशा स्वरूपाच्या चर्चांनीदेखील जोर धरला होता. मात्र, त्यानंतर स्वतः पटोले यांनी गैरहजेरीबाबत स्पष्टीकरण देत सांगितले की, माझी तब्येत ठणठणीत, माझ्यामुळे इतरांची तब्येत खराब होत असेल. काल मला दिल्लीला बोलवण्यात आले होते. सुरतच्या दौऱ्याचं नियोजन होतं. मात्र, माध्यमांमधून माझी तब्येत चांगली नव्हती म्हणून मी सभेला न आल्याचे दाखवण्यात आले. हे साफ चुकीचे असल्याचे म्हणत माझी तब्येत चांगली असते माझ्यामुळे इतरांची तब्येत खराब होत असेल असा टोला पटोले यांनी लगावला.
सत्यजीत तांबेच्या बंडामुळे अडचणीत आले होते पटोले
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली होती. त्यातच निवडणुकीतील अपक्ष विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी अनेक गौप्यस्फोट करत राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एवढेच नव्हे तर, बाळासाहेब थोरात यांनीदेखील विधानसभेतील गटनेतेपदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडींमुळे नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात आल्याची चर्चा होती. मात्र, आज सुरत येथील भेटीत पटोले आणि राहुल गांधी अतिशय निवांत चर्चा करताना दिसत आहे. या फोटोतील एकंदरीत हावभाव बघता नाना आणि राहुल गांधी अगदी रिलॅक्स मूडमध्ये एकमेकांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे मध्यंतरीच्या घडामोडींनंतर प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात आलेल्या नानांचं टेन्शन संपलं असल्याचे बोलले जात आहे.
फोटोत नेमकं काय?
सुरत येथील भेटीचा समोर आलेल्या फोटोमध्ये राहुल गांधी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोफ्यावर निवांत चर्चा करता दिसून येत आहे. बाजूला आयफोन दिसत आहे. तर, रूममध्ये असलेल्या टेबलवर एका कपामध्ये ग्रीन टी असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही नेते एकमेकांशी संवादात गुंतले असल्याचेच या फोटोत दिसून येत आहे. त्यामुळे मध्यंतरी राजकीय हालचालींमुळे पटोलेंचे पद जाते की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, आजच्या या फोटोमुळे तरी पटोले यांचे पदाचे टेन्शन गेल्याचेच बोलले जात आहे.