मुंबई महानगरपालिकेचा निकाल! मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

मुंबई महापालिका निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियावर एक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

News Photo   2026 01 17T104722.921

मुंबई महानगरपालिकेचा निकाल! मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

राज्यातील 29 महापालिकांचा काल निकाल लागला. (BMC) यामध्ये  बहुतांश ठिकाणी भाजपचा विजय झाला आहे. राज्यभरात चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपने सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहेत. तर तब्बल 20 वर्षांनी एकत्र आलेल्या राज व उद्धव ठाकरे या बंधूंनी एकत्र येऊन बीएमसी निवडणुकीत युती करत एकत्र लडत दिली. मात्र त्यांच्या पदरी पराभवच आला. भाजपला 89 तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या असून त्यांचा महापौर होणार हे चित्र स्पष्ट आहे. तर शिवेसना ठाकरे गटाला 65 आणि राज ठाकरेंच्या मनसेला बीएमसी निवडणुकीत अवघ्या 6 जागा मिळाल्या असून मनसेला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.
मुंबई महानगरपालिका महायुतीकडं! महापौर कधी निवडणार?, कशी होते निवड?
या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियावर एक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच असं त्यांनी पोस्टमध्ये नमूदल केलं आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट काय?
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.
आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.
बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.
लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया  असं आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले आहेत.
Exit mobile version