मुंबई महानगरपालिका महायुतीकडं! महापौर कधी निवडणार?, कशी होते निवड?
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 67 आणि मनसेला केवळ 6 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांना धक्का आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला आहे. (BMC) मुंबईत भाजपला 88 आणि शिवसेनेला 28 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे बंधुंना 73 आणि काँग्रेसला 24 जागा मिळाल्या आहेत. तर इतर आणि अपक्षांचा आकडा 10 इतका आहे. त्यामुळं आता मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर होणार आहे. या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. मात्र त्यांना महायुतीच्या तुलनेत काही जागा मिळता आलेल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 67 आणि मनसेला केवळ 6 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
आता मुंबईला नवा महापौर कधी मिळणार आणि कोण महापौर होणार असा प्रश्न विचारला जात आहे. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवड होण्यासाठी आणखी एक आठवडा लागू शकतो. उद्या रात्री मुख्यमंत्री फडणवीस दावोस गुंतवणूक शिखर परिषदेसाठी रवाना होणार आहेत. ते 25 जानेवारी रोजी परतणार आहेत. त्यामुळेमहापौरपदाची निवडणूक 26 जानेवारीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महानगरपालिकेत कुणाचे किती उमेदवार?, वाचा, एका क्लिकवर सर्व विजयी उमेदवारांची यादी
मुंबई महापालिकेच्या महापौरांची थेट निवड होत नाही. बीएमसीमधील निवडून आलेले नगरसेवक आपल्यामधून महापौर निवडतात. बहुमत मिळालेल्या पक्षाच्या एका नगरसेवकाची निवड महापौर म्हणून केली जाते. आता काही दिवसांनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त महापौर निवडणूक प्रक्रियेची घोषणा करतील. यानंतर महापौर श्रेणीसाठी सोडत काढली जाईल आणि त्यानंतर महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी निवडणूक घेतली जाईल. महापौरांचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा असतो. त्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाचा महापौर बनवला जातो.
मुंबईच्या महापौरांना शहराचे ‘प्रथम नागरिक’ मानले जाते. महापौर हे मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष असतात. महापालिकेच्या मासिक आणि विशेष सभा बोलावणे आणि त्यांचे अध्यक्षपद भूषवणे ही महापौरांची मुख्य जबाबदारी असते. सभागृहात विविध नागरी प्रश्नांवर होणाऱ्या चर्चेचे नियमन करणे आणि प्रस्तावांवर मतदान घडवून आणणे. सभागृहात लोकशाही मार्गाने कामकाज चालेल आणि शिस्त पाळली जाईल याची खात्री करणे ही काही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते.
