मुंबई महापालिकेच्या सत्तासमीकरणासाठी भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला निश्चित; भाजपचा महापौर
मुंबई महापालिकेत महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उपमहापौरपद मिळण्याची दाट शक्यता.
BJP mayor to sit in Mumbai Municipal Corporation for second time : मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणाबाबत महायुतीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरनंतर आता मुंबई महापालिकेचाही सत्ता वाटपाचा आराखडा ठरल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेत महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उपमहापौरपद मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेतील सत्ता समीकरणांबाबत काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत वेगवेगळी बैठक झाली होती. या बैठकीतच मुंबई महापालिकेतील सत्तेचा अंतिम फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीमध्ये आगामी काळात महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद शिवसेनेलाही मिळणार असले, तरी सध्याच्या टप्प्यावर ही दोन्ही महत्त्वाची पदं भाजपकडे राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रभाग समित्यांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
आमदार नसताना देखील सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होऊ शकतात का, कायदा काय सांगतो?
ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असणार आहे. तर, मुंबईत भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर असा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेत भाजपचा हा दुसरा महापौर असणार आहे. याआधी भाजपचे प्रभाकर पै हे 1982 साली मुंबईचे महापौर होते. तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरे गटाची मुंबई महापालिकेतील सत्ता संपुष्टात येत असून, महापौरपद भाजपकडे जाणार आहे. यापूर्वी अनेक वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची युती सत्तेत होती.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल (BMC Election Result 2026):
भाजप – 89
शिवसेना (ठाकरे गट) – 65
शिवसेना (शिंदे गट) – 29
काँग्रेस – 24
मनसे – 6
एमआयएम – 8
एनसीपी – 3
एसपी – 2
एनसीपी (शरद पवार गट) – 1
एकूण – 227
