प्लास्टिक बंदी अधिक कठोर; उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच जीआर काढण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
Chief Minister Devendra Fadnavis’ big announcement : राज्यात नैसर्गिकरीत्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर पूर्वीपासूनच बंदी लागू आहे. ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) काढण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या नव्या निर्णयामध्ये केवळ प्लास्टिक फुलांचे उत्पादन आणि विक्रीच नव्हे, तर सजावटीसाठी त्यांचा वापर करणाऱ्या डेकोरेटर्सनाही शिक्षेस पात्र ठरवण्यात येणार आहे. तसेच, अशा प्रकारच्या डेकोरेशनला परवानगी देणाऱ्या मोठ्या हॉल व्यवस्थापनांवरही कारवाईची तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्लास्टिक वस्तूंच्या गुणवत्तेचा मुद्दाही सभागृहात उपस्थित झाला. प्लास्टिक वस्तू टिकाऊ असल्या तरी त्यात वापरले जाणारे प्लास्टिक कमी दर्जाचे असल्यास ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते, याकडे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्ष वेधले. कमी दर्जाची प्लास्टिकची खेळणी, फुगे आणि फुलांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली.
मी बोलतो, तीच भाजपची अधिकृत भूमिका इतरांचं… वादग्रस्त व्यक्तव्यांवरून फडणवीसांकडून राणेंची कान उघडणी
याच चर्चेदरम्यान दादर फुल मार्केटमधील कारवाईचा मुद्दाही उपस्थित झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जयंत पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमणाच्या नावाखाली दादरमधील फुल विक्रेत्यांना हटवल्याचा आरोप केला. या कारवाईच्या निषेधार्थ मुंबई फुल विक्रेता असोसिएशनने बंद पुकारला असून सध्या फुलविक्री पूर्णपणे बंद असल्याचे त्यांनी सांगितले. हा बंद मागे घेण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, अतिक्रमण कारवाईमुळे फुल विक्रेत्यांवर अन्याय झाला असेल, तर त्यांना योग्य ती पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल. यासंदर्भात महापालिकेला तातडीने आदेश देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. पर्यावरण विभागाकडून झालेल्या कारवाईची माहिती देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांत राज्यात 92 हजार ठिकाणी प्लास्टिक बंदीचे उल्लंघन आढळले आहे.
या काळात 4135 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून सुमारे 25 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर शिक्षेची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या उल्लंघनासाठी 5 हजार रुपये दंड, दुसऱ्या वेळी 10 हजार रुपये दंड, तर तिसऱ्या वेळी तीन महिन्यांचा कारावास आणि 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा लागू केली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
