धर्मेंद्र प्रधानांसह मोदींनीही राजीनामा द्यावा; आमरण उपोषणाची घोषणा करत अभिजीत दिपके आक्रमक
सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
Abhijit Deepaké announces a fast unto death : नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी नवे वळण मिळाले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून बेमुदत उपोषण करत असलेले शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी पहाटे आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून आंदोलनकर्त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला.
शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. वांगचुक यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आंदोलनकर्त्यांनी याला विरोध दर्शवत ही कारवाई बळजबरीची असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आजपासून मी उपोषण सुरू करत आहे. 20 जुलै रोजी नियोजित मोर्चाही निघेल आणि आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.
Abhijeet Dipke; “If they think that taking Sonam Sir away will end this movement, they are mistaken. We will remain here, and will march to Parliament on July 20.” pic.twitter.com/GKvaIbcLK9
— Cockroach Janta Party (@CJP_for_India) July 18, 2026
सोनम वांगचुक यांना हटवून हे आंदोलन थांबेल असे सरकारला वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे, असे अभिजीत दिपके यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोपही केले आहेत. आंदोलनस्थळावरून हटवताना पोलिसांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच जंतर-मंतर परिसरातून कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनाही हटविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे आंदोलनकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांचा आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कामकाजाविरोधात आंदोलनकर्त्यांनी आवाज उठवला आहे.
विशेष म्हणजे, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच ही पोलीस कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने त्यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. कोणत्याही नागरिकाचा जीव सर्वात महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने प्रशासनाला वांगचुक यांच्या आरोग्यावर नियमित लक्ष ठेवण्याचे आणि दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले होते.
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात, उपचारांसाठी रुग्णालयात केलं दाखल
शुक्रवारी वांगचुक यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले होते. सलग 20 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांचे वजन नऊ किलोहून अधिक कमी झाले असून शरीरातील ऊर्जा साठे संपत चालल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शरीरातील ग्लुकोज आणि चरबीचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने स्नायूंची झीज सुरू झाली असून उपोषण त्वरित थांबवले नाही तर महत्त्वाचे अवयव निकामी होण्याचा धोका असल्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला होता.
दरम्यान, सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलन संपणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला असून २० जुलै रोजी प्रस्तावित ‘चलो संसद’ आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.