सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात, उपचारांसाठी रुग्णालयात केलं दाखल
प्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले आहे.
नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मोठी घडामोड घडली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या उपोषणाचा हा 21 वा दिवस होता. पोलिसांच्या या कारवाईनंतर जंतर-मंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक हे 28 जूनपासून जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषण करत होते. नीटसह विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली होती.
#WATCH | Delhi: Activist Sonam Wangchuk, who was sitting on a hunger strike from last 20 days at Jantar Mantar, being taken to the hospital by the police.
More details awaited. pic.twitter.com/JzOiYWGmch
— ANI (@ANI) July 18, 2026
गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली होती. शुक्रवारी रात्री त्यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत आपल्या आरोग्याविषयी माहिती दिली होती. या संदेशात त्यांनी उपोषणादरम्यान आपले सुमारे २० टक्के वजन घटल्याचे सांगितले. तसेच शरीरातील स्नायूंवरही परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, शारीरिक स्थिती कमकुवत असली तरी मानसिकदृष्ट्या आपण खंबीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
व्हिडीओ संदेशाद्वारे त्यांनी नागरिकांना 20 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या चलो संसद आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सरकारला कांद्याच्या दरवाढीसाठी जबाबदार धरले जाऊ शकते, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवरही सरकारने उत्तर द्यायला हवे, असे ते म्हणाले. नीट परीक्षेतील वादग्रस्त घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी टोकाची पावले उचलल्याचा दावा करत त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.
देशात 10 वर्षांत पेपरफुटीच्या 152 घटना, पण एकालाही शिक्षा नाही; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने आणि प्रकृती अधिक खालावत असल्याने पोलिसांनी वैद्यकीय कारणास्तव त्यांना आंदोलनस्थळावरून हलविल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जंतर-मंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही काळ गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले.
सोनम वांगचुक आणि त्यांच्या समर्थक संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कामकाजाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांची पारदर्शक तपासणी आणि देशातील परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा यांचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
जंतर-मंतरवरील या आंदोलनाने आता राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या मुद्द्यावर केंद्र सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.