स्वच्छतेचे तीन तेरा; पुण्यातील नामांकित बेकरीसह राज्यातील10 रेस्टॉरंट आणि कॅन्टीनचे परवाने निलंबित
कारवाईमुळे खाद्य व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली असून ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Major action by the FDA : पुणे शहरातील नामांकित खाद्य व्यावसायिक आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन, अन्न सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांची निर्मिती होत असल्याचे आढळून आल्यानंतर पुण्यासह राज्यातील दहा बेकारी, रेस्टोरंट, डेअरी आणि कॅन्टीनचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खाद्य व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली असून ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गुरुवार आणि शुक्रवारी एफडीएकडून राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. तपाणीदरम्यान अनेक आस्थापनांमध्ये अन्नपदार्थ तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत अस्वच्छ वातावरणात सुरू असल्याचे आढळून आले. काह्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक स्वच्छतेचे नियम पाळले जात नव्हते, तर काही ठिकाणी अन्नसुरक्षा मानकांचे गंभरी उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित आस्थापनांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
एफडीएने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमधून काही ठिकाणी अन्नपदार्थ गलिच्छ आणि आरोग्यास धोकादायक परिस्थितीत तयार केले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या छायाचित्रांमुळे ग्राहकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः रोज हजारो ग्राहक भेट देणाऱ्या काही नामांकित आस्थापनांमध्ये अशा प्रकारच्या त्रुटी आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात, उपचारांसाठी रुग्णालयात केलं दाखल
कारवाई झालेल्या आस्थापनांमध्ये पुण्यातील मंगळवार पेठेतील स्टार केटरिंग सर्व्हिस, सोमवार पेठेतील अशोक बार अँड रेस्टॉरंट, येवलेवाडी येथील गोल्डन मॅजेस्टिक बेकरी, कोंढव्यातील प्रसिद्ध गोल्डन बेकरी आणि बाणेरमधील बिकांगे बिर्याणी एलएलपी यांचा समावेश आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यातील पारगाव पेठ येथील सिद्धार्थ ॲग्रो डेअरी, सांगलीतील हलद भवन कॅन्टीन, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा आणि सिगडी रेस्टॉरंट तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी येथील व्हीबीजीओआर शाळा कॅन्टीनवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
एफडीएने संबंधित आस्थापनांना तातडीने आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वच्छता, अन्न साठवणूक, अन्नपदार्थ निर्मिती प्रक्रिया आणि अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन केल्यानंतरच या आस्थापनांबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही एफडीएने दिला आहे. आगामी काळात राज्यभर अशाच प्रकारच्या तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.