आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ ठाकरे कुटुंबियांतील आणखी एक युवराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवसेनेकडून (Shivsena) विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना पुन्हा एकदा तिकीट दिले आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत किंवा प्रकाश पाटणकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला, मोठ्या प्रमाणात असलेली मराठी मतदारांची संख्या अशी दादर-माहीमची ओळख आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी असलेली सहानुभूती, सदा सरवणकर यांचा होल्ड आणि विरोधात नवखे अमित ठाकरे असे सध्याचे मतदारसंघातील चित्र बनले आहे. त्यामुळे आतापर्यंत फारसा चर्चेत नसणारा माहीम मतदारसंघ अचानक व्हिआयपी बनला आहे. (Raj Thackeray’s son Amit Thackeray has been announced as candidate by MNS from Mahim assembly constituency)
अमित ठाकरे मागील अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रिय आहेत. मात्र यापूर्वी ते केवळ संघटनेत काम करत होते. यावेळी ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच अमित ठाकरे निवडणूक लढवणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांच्यासाठी दोन जागांची चाचपणीही सुरू होती. माहीम आणि भांडुप पश्चिम विधानसभा जागांचा आढावा घेतला जात होता. यात अखेर माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवसेनेकडून कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिले आहे. सरवणकर यांनी आतापर्यंत विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष अशी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. सरवणकर 1992 ते 2007 पर्यंत मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर 2004 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये सदा सरवणकर यांना तिकीट नाकारत पक्षाने आदेश बांदेकर यांना तिकीट दिले. त्यावेळी नाराज होत सदा सरवणकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. 2009 ची निवडणूक त्यांनी काँग्रेसकडून लढवली. त्यावेळी मनसेच्या नितीन सरदेसाई यांनी बाजी मारली.
2012 मध्ये सरवणकरांनी घरवापसी केली. त्यावेळी माहिम दादर विधानसभेवर पुन्हा भगवा फडकविण्याची जबाबदारी सदा सरवणकर यांच्यावर सोपविण्यात आली. पक्षाने सदा सरवणकर यांची विभागप्रमुख पदावर नियुक्ती करत त्यांना पक्षबांधणीची जबाबदारी दिली. त्यानंतर सर्वात 2014 आणि 2019 मध्ये सदा सरवणकर आमदार म्हणून निवडून आले आहेत. माहीम, दादरचा गड शिवसेनेकडे राखून ठेवण्याचं काम सदा सरवणकरांनी केलं आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर सरवणकरांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. काही दिवसांपूर्वीच सदा सरवणकर सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.
दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दादर माहिम विधानसभेत चांगला चेहरा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. दादर माहिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून महेश सावंत किंवा प्रकाश पाटणकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या दोघांसोबतच उद्धव ठाकरेंनी वेगवेगळी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर आता ठाकरे गटाकडून दादर-माहिम विधानसभा मतदारसंघावर कोणाला उमेदवारी द्यायची, याची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे दादर-माहिम मतदारसंघात अमित ठाकरे विरुद्ध कोण लढणार याकडे सर्वांचेच लक्ष झालं आहे. पण माहीम मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाची भूमिका महत्त्वाची असणार हे नक्की आहे.
दबक्या आवाजात उद्धव ठाकरे इथून उमेदवार देणार नसल्याच्याही चर्चा आहेत. गतवेळी आदित्य ठाकरे पहिल्यांदा वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, त्यावेळी राज ठाकरे यांनी राजकारणापलीकडे कौटुंबिक नातं जपत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजयही झाला होता. आता उद्धव ठाकरे यांचे पुतणे अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडूनही उमेदवार देण्यात येऊ नये, असा एक मतप्रवाह ठाकरे गटात आहे. आता माहीम मतदारसंघातून ठाकरे गट माघार घेणार की, उमेदवार देणार? की, माहीमची जागा मित्रपक्षाला सोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.