फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मुंबईतील पहिली बंडखोरी रोखण्यात यश, नाराज राज पुरोहित भाजपसोबतच
Raj Purohit : महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections) भाजपकडून (BJP) 99 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. तर दुसरी यादी देखील गुरुवारपर्यंत जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र भाजपकडून पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेक भाजप नेते नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपने आपल्या पहिली यादीमध्ये कुलाबा मतदारसंघातून (Colaba Constituency) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी मंत्री राज पुरोहित नाराज (Raj Purohit) झाले होते आणि ते बंडखोरी करू शकतात अशी चर्चा वर्तवण्यात येत होती. मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कुलाबा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना नाराज राज पुरोहित यांची समजूत काढण्यात यश आले आहे.
माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, महाविकास आघाडीकडे कुलाबा मतदारसंघात उमेदवार नसल्याने त्यांनी उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तसेच कुलाबात महायुतीचा विजय होणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. राजस्थानी समाज, व्यापारी समाज आणि स्वतः राज पुरोहित आमच्यासोबत असल्याने विजय महायुतीचा होणार आहे असं देखील यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले. गेल्या अनेक वर्षात भाजपने या मतदारसंघात अनेक विकासाचे काम केले आहे असेही राहुल नार्वेकर म्हणाले.
‘पौर्णिमेचा फेरा’ हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ युट्युब चॅनेलवर पाहता येणार
तर यावेळी माजी मंत्री राज पुरोहित म्हणाले की, मी गेल्या 44 वर्षांपासून व्यापारी समाजासोबत काम करत आहे. मी स्वतः, राजस्थानी समाज आणि व्यापारी समाज संपूर्ण ताकदीने भाजपसोबत असल्याची घोषणा देखील माध्यमांशी बोलताना त्यांनी केली. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदार प्रक्रिया पार पडणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील 38 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. आज किंवा उद्या महाविकास आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.