Download App

हातकणंगलेत ठाकरे-पाटील ‘शेट्टींसाठी’ आग्रही… पण त्यांनी तर 2019 चा धसका घेतलाय!

एखादे लग्न जवळपास ठरते. सगळ्या गोष्टी पक्क्या होतात. पण लग्नावेळी नवरदेवच ऐनवेळी म्हणतो मला हे लग्नच करायचे नाही. त्यावेळी मुलीच्या वडिलांची जी दयनीय अवस्था होत असावी तशी अवस्था सध्या शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसचे (Congress) नेते सतेज पाटील (Satej Patil) यांची हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झालीय. याचे कारणही तसेच आहे. (Raju Shetty has announced that he will contest for parliament independently without joining hands with Congress, NCP and Shiv Sena.)

मागील दोन वर्षांपासून नाही-होय, नाही-होय म्हणत आणि मजल दरमजल करत कालपर्यंत राजू शेट्टी महाविकास आघाडीत दाखल झाल्याचे चित्र होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. ही भेट उद्योगपती गौतम अदाणी यांच्या त्रासाविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण मूळ उद्देश हा राजकीय संदेश देणे हाच असल्याचे बोलले गेले. त्याचवेळी कोल्हापूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनीही म्हटले होते की राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीसोबत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

तिकडे हातकणंगलेमधून लोकसभेसाठी जिल्हाप्रमुख असलेले मुरलीधर जाधव ठाकरे गटाकडून तयारी करत होते. पण ठाकरे-शेट्टींची भेट होताच त्यांच्या तयारीला ब्रेक लागला. त्यांनी या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला. राजू शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आम्ही साहेब पहिल्यापासून तुमच्यासोबत आहे. 195 बीपी झाला तरी छाती फुटेपर्यंत आंदोलने केली आहेत, केसेस अंगावर घेतल्या आहेत. मला नको पण सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी द्या, सामान्य शिवसैनिकावर अन्याय करु नका, अशी विनंती त्यांनी केली.

पण जाधव यांचे हेच भाषण व्हायरल होताच अवघ्या दोन दिवसांतच त्यांची जिल्हाप्रमुखपदावरुन हकालपट्टी केली. त्यांच्या हकालपट्टीवरुनच शेट्टी महाविकास आघाडीत येत असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात होते. थोडक्यात काय तर शेट्टी यांच्यासाठी ठाकरे आणि पाटील हे दोघेही आग्रही असल्याचे दिसून येत होते.

पण आता राजू शेट्टी यांनी स्वबळाचा नारा देत ठाकरे आणि पाटील यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेशी हातमिळवणी न करता स्वतंत्रपणे खासदारकी लढवण्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ता स्नेहमेळाव्यात शेट्टी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमागे त्यांनी 2019 चा पराभव अजूनही विसरला नसून त्याच पराभवाचा धसका त्यांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे.

प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील यांनी ही खदखद बोलूनही दाखविली. 2024 च्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी किंचितही गाफील राहता कामा नये. 2019 चा अनुभव फार वाईट आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो, मात्र स्वाभिमानीची फसगत झाली. याची येणाऱ्या निवडणुकीत पुनरावृत्ती करायची नसून हाच अनुभव लोकसभेत जिंकण्यासाठी उपयुक्त ठरेल’, असे वक्तव्य त्यांनी केले. थोडक्यात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर फसवल्याचा आरोप केला.

काय घडले होते 2019 मध्ये?

2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या निवेदिता माने विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विरुद्ध शिवसेना-भाजपचे रघुनाथदादा पाटील अशी तिरंगी लढत रंगली होती. त्यावेळी राजू शेट्टी यांनी यात 95 हजार मतांनी बाजी मारली. 2014 मध्ये राजू शेट्टी यांनी महायुतीसोबत जात तब्बल 1 लाख 77 हजारांच्या मताधिक्याने मोठा विजय मिळविला. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना आणि भाजप पुरस्कृत राजू शेट्टी यांना सहा लाख 40 हजार मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलाप्पा आवाडे यांना 4 लाख 62 हजार मते मिळाली.

2019 ला मात्र गणिते बदलली. महायुतीपासून फारकत घेत राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला. शिवसेना तिथे उमेदवाराच्या शोधात होती. हीच संधी साधत 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या ज्या निवेदिता माने यांचा शेट्टी यांनी पराभव केला होता. त्याच माने यांनी शिवसेनेचे शिवबंधन बांधले आणि आपला मुलगा धैर्यशील याला रिंगणात उतरवले. धैर्यशील माने यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात नसलेली चुरस निर्माण झाली.

नाही म्हणता म्हणता, काहीच दिवसात धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींपुढे आव्हान उभे केले आहे. वारे फिरले. शेट्टींचा 95 हजार मतांनी पराभव झाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही जणांनी मानेंना अंतर्गत मदत केल्याचे दबक्या आवाजात बोलले गेले. कारण ज्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून काँंग्रेसचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे निवडणूक लढवत होते, त्यांच्याच मतदारसंघातून माने यांना घसघशीत 76 हजारांचे मताधिक्य मिळाले होते.

त्यापाठोपाठ आवळे कुटुंबीय आणि काँग्रेसचा स्ट्राँग होल्ड असलेल्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात माने यांना 44 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. माने यांचे या दोन्ही पक्षातील नेत्यांशी असलेले जुने संबंध आणि राजू शेट्टींच्या या भागातील वाढत्या प्रस्थाला आळा घालणे अशी दोन्ही उद्दिष्ट्ये या निवडणुकीतून साध्य झाल्याचे सांगितले गेले. हीच सल मनात ठेवून आता राजू शेट्टी पुन्हा त्या वाटेला नकोच रे बाबा या सुरामध्ये आल्याचे बोलले जात आहे

follow us