मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे तुरुंगात जाणार; पूर्णेकर हत्या प्रकरणात राम पूर्णेकरांचा मोठा दावा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातमीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे तुरुंगात जातील, असा दावा त्यांच्या मुलगा राम पूर्णेकर याने केला.

News Photo   2026 10 20T190617.920

Pradeep Purnekar Murder Case

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Mumbai) पक्षाच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याआधी ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा मुद्दा चर्चेत आला आहे. प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर याने या प्रकरणातील कथित सूत्रधार राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे तुरुंगात जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला विश्वास असून, दोघांकडूनही न्यायाची अपेक्षा असल्याचं राम याने माध्यमांशी बोलताना सांगितलं. यावेळी माजी खासदार राजन विचारे आणि केदार दिघे उपस्थित होते.

राम पूर्णेकर याने सांगितलं की, त्याचे वडील दरवर्षी दसरा मेळाव्याला जात होते, मात्र यंदा पहिल्यांदाच तो मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. वडील हयात नसताना त्यांचा मुलगा मेळाव्याला गेला नाही, असं होऊ नये, या भावनेतून आपण शिवाजी पार्कवर जात असल्याचं त्याने स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याबाबत भूमिका मांडावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. गेल्या 20 दिवसांत ठाकरे यांनी कुटुंबासाठी खूप काही केल्याचं सांगत, त्यांनी न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिल्याचं राम म्हणाला.

‘तुझा नेक्स्ट गेम’, प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला जीवे मारण्याची धमकी; प्रताप सरनाईकांनी घेतली पुर्णेकर कुटुंबाची भेट

प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबर रोजी ठाण्यातील मानपाडा परिसरातील त्यांच्या कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पूर्णेकर कुटुंबाने शिंदेंच्या शिवसेनेतील नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. मीनाक्षी शिंदे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. राम पूर्णेकर याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली होती, तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवादही साधला होता. या प्रकरणात न्याय मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात नितीन बानगुडे पाटील, सुषमा अंधारे, अंबादास दानवे, कैलास पाटील, भास्कर जाधव, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पूर्णेकर यांच्या नावाच्या पाट्या घेऊन कार्यकर्ते उपस्थित असल्याचं राम याने सांगितलं. हेच आपले खरे शिवसैनिक असल्याची भावना व्यक्त करत त्याने आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळण्याची अपेक्षा पुन्हा अधोरेखित केली.

Exit mobile version