कर्नाटकच्या राजकारणात मागील काही (Karnatak) दिवसांपासून मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. सिद्धरामय्या यांच्याजागी आता डी.के.शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची ३ जून रोजी शपथ घेतली. यावेळी १२ जणांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. मात्र, शपथविधीनंतर दोन दिवसांतच कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं आहे. सरकारमधील कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
रामलिंगा रेड्डी यांना जलसंपदा खातं देण्यात आलं. मात्र, रामलिंगा रेड्डी यांनी बंगळुर नगरविकास खात्यासाठी आग्रह धरला आणि कोणत्याही परिस्थितीत जलसंपदा खातं स्वीकारणार नाही, असं सांगितलं. तसंच त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, मी खातं स्वीकारून आपल्या सद्सद्विवेकबुद्धीच्या विरोधात काम करू शकत नाहीत. मी आमदार आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन.
कर्नाटकात सत्तांतर; देशातील सर्वात श्रीमंत आमदार डीके शिवकुमार यांनी घेतली CM पदाची शपथ
पत्रकार परिषदेत रामलिंगा रेड्डी यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार स्वतः माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला 2023 मध्ये हे खातं देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळं, हेच खातं मला दिलं पाहिजे. तसंच मी मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळं मी आज राजीनामा दिला.
भावूक होत रामलिंगा रेड्डी म्हणाले, मी स्वतः हे खातं मागितलं नव्हते. त्यांनी मला हे खातं देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण त्यांनी माझा विश्वासघात केला आहे. दरम्यान, रामलिंगा रेड्डी यांनी एका समर्थकामार्फत मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांना आपला राजीनामा पाठवला. त्यांनी लिहिलं आहे की, मी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. मला हे पद देऊ केल्याबद्दल मी खूप आभारी आहे. मात्र, मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीच्या विरोधात वागू शकत नाही, म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. कृपया तो स्वीकारावा.
