कर्नाटकात सत्तांतर; देशातील सर्वात श्रीमंत आमदार डीके शिवकुमार यांनी घेतली CM पदाची शपथ

वयाच्या ६४ व्या वर्षी, शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांची एकूण घोषित मालमत्ता १,४१३ कोटी रुपयांच्या घरात आहे.

  • Written By: Published:
Letsupp Image   2026 06 03T162946.385

D.K. Shivakumar Takes Oath As A CM Of Karnataka : कर्नाटकात आजपासून (दि.3) डी. के. शिवकुमार युगाला सुरुवात झाली असून, बुधवारी झालेल्या एका सोहळ्यात डी. के. शिवकुमार यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांची एकूण घोषित मालमत्ता 1,413 कोटी रुपयांच्या घरात आहे. शिवकुमार यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळात जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. शिवकुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात 13 नवीन मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू त्यांच्या 931 कोटी रुपये संपत्तीवरुन दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय त्यांच्या 658 कोटी रुपये संपत्तीवरुन तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

डी.के.शिवकुमार यांची संपत्ती नेमकी किती?

कर्नाटकचे डीकेएस म्हणून लोकप्रिय असलेले शिवकुमार यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. डीके शिवकुमार कनकापुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांच्याकडे एकूण 1413 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या नावावर 970 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या कुटुंबाची संपत्ती 251 कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते, तर 2018 च्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेचे मूल्य 840 कोटी रुपये होते. प्रतिज्ञापत्रानुसार शिवकुमार यांची 12 बँक खाती आहेत. यापैकी काही खाती त्यांचे भाऊ डीके सुरेश संयुक्तपणे सांभाळतात. त्यांच्या नावावर 225 कोटी रुपयांचे कर्जही आहे. शिवकुमार यांच्या नावावर टोयोटा कार आहे, ज्याची किंमत 8 कोटी 3 लाख रुपये आहे.

डी. के. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक मानले जातात. यामध्ये स्थावर मालमत्ता, व्यावसायिक गुंतवणूक, कृषी जमीन, आलिशान मालमत्ता आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणुकीचा समावेश आहे. त्यामुळेच कर्नाटक काँग्रेसमध्ये त्यांना केवळ राजकीयदृष्ट्या नाही, तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत प्रभावशाली नेता मानलं जातं. राजकीय व्यवस्थापनासोबतच संसाधन उभारणी आणि संघटन सांभाळण्यामध्येही त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो.
विरोधकांचे असणार बारीक लक्ष
मागील काही वर्षांत डी.के शिवकुमार यांच्यावर पदाचा गैरवापर आणि उत्पन्नाच्या स्रोतांच्या पलीकडे संपत्ती जमा केल्याचे अनेक आरोप झाले. जरी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले अनेक खटले न्यायालयांनी रद्द केले असले तरी, काही खटले अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. विरोधकांचे गंभीर आरोप होत असले तरीही कर्नाटकात काँग्रेस वाढवण्यात शिवकुमार यांचं योगदान पाहून काँग्रेस हाय कमांडने त्यांच्यावर आता मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली आहे. आता पुढील काळात त्यांच्या संपत्तीत वाढ होते की, तेवढीच राहते याकडे विरोधकांचे बारीक लक्ष असेल.

 

follow us