30 सप्टेंबर 2024. अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना फोन करुन फलटण मतदारसंघातून दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांची उमेदवारी जाहीर केली. पण पुढच्या महिन्याभरात अशा काही घडामोडी घडल्या की रामराजेंनी अजितदादांची साथ सोडली. दीपक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार झाले. यामुळे अजितदादा चांगलेच दुखावले गेले. तुम्ही फक्त दीपक चव्हाणांच्या प्रचारात जावाच, तुम्ही आमदार कसे राहता हेच बघतो, असा इशाराच त्यांनी रामराजेंना दिला. अजितदादांनीही डोक्यात ठेवून रामराजेंसह दीपक चव्हाणांचा करेक्ट कार्यक्रम केला. भाजपचे तालुकाध्यक्ष असलेल्या सचिन कांबळे-पाटील यांना उमेदवारी देऊन निवडूनही आणले.
पण आता निकालाच्या जवळपास दोन महिन्यांनंतर रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवार यांचे सूर पुन्हा जुळले आहेत. मंगळवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची साप्ताहिक बैठक अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडली. याच बैठकीला रामराजे नाईक निंबाळकर अचानक उपस्थित राहिले. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पहिल्यांदाच पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली. अजित दादांनीही त्यांच्या ज्येष्ठतेचा सन्मान ठेवत त्यांना शेजारीच बसवून घेतले. त्यामुळे रामराजेंची नाराजी आता दूर झाल्याचे बोलले जात आहे. (Ramraje Naik Nimbalkar’s displeasure has been resolved and he was present at Ajit Pawar’s party meeting.)
ण ते नाराज का होते? आणि आता अजितदादांनी त्यांची नाराजी कोणत्या मुद्द्यावर दूर केली? अजितदादांसाठी रामराजे एवढे महत्वाचे का आहेत? पाहुया या व्हिडीओमधून…
पुण्यापाठोपाठ सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्याच्या राजकारणावर गेली तीन दशके रामराजे नाईक निंबाळकर वर्चस्व गाजवत आहेत. वयाच्या पंचाहात्तरीत असलेल्या रामराजेंना जिल्ह्याच्या राजकारणाचे खाचखळगे अवगत आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांचे जिल्ह्याच्या राजकारणात फारसे जमले नाही. याच उदयनराजे भोसले यांना रामराजेंनी कायमच राजकीय शह दिला. त्यामुळे अजितदादांनीही त्यांना कायमच ताकद दिली. पुढे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले हे दोघंही भाजपमध्ये गेल्यानंतर एकत्रित राष्ट्रवादीत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील या आमदारांना संपूर्ण जिल्ह्यात काम करताना मर्यादा होत्या. पण या मर्यादा रामराजेंना नव्हत्या. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची पोकळी भरून काढली.
फलटण विधानसभा मतदारसंघावरही रामराजे नाईक- निंबाळकर यांची गेली 35 वर्षे एकहाती सत्ता होती. ज्या वेळी विरोधक म्हणून नवे नेतृत्व उभे राहिले, त्या -त्या वेळी रामराजे यांनी त्यांची राजकीय ताकद दाखवली. फलटण नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा या सर्व ठिकाणी रामराजे आणि बंधू संजीवराजे व रघुनाथराजे यांचेच वर्चस्व होते. राष्ट्रवादीतील बंडानंतर उगवत्या सूर्याला नमस्कार या तत्वानुसार रामराजेंनीही अजितदादांची साथ दिली. पण भाजपसोबत युती झाल्यानंतर कट्टर विरोधक आणि तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर रामराजेंच्या वाट्याला आले. तिथूनच जिल्ह्याच्या राजकारणात युतीतील कुरबुरी सुरू झाल्या.
आमचा विरोध हा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांना नाही. आमचा विरोध हा माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आहे, असं म्हणत रामराजेंनी रान पेटवले. प्रशासनाला वेठीस धरून कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवणारी टोळीच जिल्ह्यात तयार झाली होती. त्याचे म्होरके रणजितसिंह होते, अशी टीका रामराजे करत होते. यातूनच त्यांनी लोकसभेला त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला. पण भाजपने रणजितसिंहांनाच उमेदवारी दिली. मग रामराजेंनी जमेल त्या पद्धतीने विरोधात काम केले अन् रणजितसिंह निंबाळकरांचा पराभव घडवून आणला.
विधानसभा निवडणुकीवेळीही रामराजेंची हीच एकमेव तक्रार होती. भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांना त्रास दिला जातोय. त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करतात. त्यांना आमदार जयकुमार गोरे यांची साथ मिळत आहे. फलटण मतदारसंघात गोरेंचा हस्तक्षेप वाढत आहे. या दहशतीला भारतीय जनता पक्षाने सत्तेतून साथ देऊ नका. नाही तर आपल्याला हाती तुतारी घ्यायला किती वेळ लागतो, असा इशारा ते देत राहिले. अजितदादांनी रामराजेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. दीपक चव्हाण यांची उमेदवारीही फलटणमधून जाहीर झाली. पण रामराजेंचे समाधान झाले. अखेर संजीवराजे नाईक निंबाळकरांसह दीपक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार झाले.
मग अजितदादांनी ऐनवेळी भाजपचे तालुका अध्यक्ष असलेल्या सचिन कांबळे पाटील यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली. त्यांच्या विजयासाठी फिल्डिंग लावली. फलटणमध्ये सभा घेतली. तसंच तुम्ही फक्त दीपक चव्हाणांच्या प्रचारात जावाच, तुम्ही आमदार कसे राहता हेच बघतो, असा इशाराच त्यांनी रामराजेंना दिला. श्रीमंत बंद दाराआड बैठका घेतात. तुमच्या धमक असेल तर आमदारकीला लाथ मारा आणि तिकडे जावा. आमदारकी पण टिकवायची आणि असा प्रचार करायचा हे योग्य नाही, असं म्हणत रामराजेंच्या अंतर्गत बैठकांवर भाष्य केलं. लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढायचा असल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकरांनीही प्रचारात झोकून दिले. अन् फलटणमध्ये रामराजेंसह दीपक चव्हाणांचा करेक्ट कार्यक्रम केला.
पण इथेच रामराजेंनी राजकीय डावपेच खेळले. त्यांनी ना राष्ट्रवादी सोडली ना ते शरद पवार किंवा अजित पवार यांच्या स्टेजवर गेले, ते केवळ अंतर्गत बैठका घेत होते. आता दोन महिन्यांनंतर रामराजे पुन्हा अजितदादांच्या जवळ दिसू लागले आहेत. त्यामुळे नेमकी त्यांची कोणत्या मुद्द्यावर नाराजी दूर झाली असा प्रश्न विचारला जातोय. इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे रामराजे निंबाळकर आणि अजित पवार या दोघांनाही जिल्ह्यात काम करताना एकमेकांची गरज आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत रामराजेंच्या अनुभवाचा अजितदादांना फायदा होऊ शकतो. तर आमदारकी शाबूत ठेवायची असल्यास आज ना उद्या रामराजेंना अजितदादांकडे जाणे भाग होते.
रामराजेंनी अजितदादांनाही एक गोष्ट पटवून दिली की आपला विरोध केवळ आणि केवळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आहे.या व्यतिरिक्त रामराजे नाईक निंबाळकर यांची अजितदादांशी तीन मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. यात पहिली गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची. यात मग फलटण नगरपालिका ते जिल्हा परिषद इथे रामराजे नाईक निंबाळकर म्हणतील तेच उमेदवार असतील. दुसरी गोष्ट म्हणजे काही दिवसांत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रामराजेंची विधान परिषदेची आमदारकी त्यांना देण्यात येणार आहे. निधीबाबतही रामराजेंनी अजितदादांना शब्द टाकला आहे. याच सगळ्या मुद्द्यांवर रामराजेंनी पुन्हा अजितदादांशी जुळवून घेतले आहे