नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजत असलेल्या सीमाप्रश्नी आज कर्नाटक सरकारविरोधातील ठराव महाराष्ट्र विधिमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. सीमा भागातील ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे, असे ठरावात उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला व तो एकमताने मंजूर झाला.
कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद हा सनदशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे दृढ निश्चयाने व संपुर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल. ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे, असा उल्लेख या ठरावात करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा याद्वारे कर्नाटक प्रशासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करण्याबरोबरच महाराष्ट्र विधानसभा नियम ११० नुसार,
१. बेळगाव, निपाणी, बिदर भालकीसह कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल.
२. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद हा सनदशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे दृढ निश्चयाने व संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल.
३. ८६५ गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे.
४. याबाबत केंद्र शासनाने गृहमंत्री भारत सरकार यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अमंलबजावणी करण्याचा आग्रह कर्नाटक शासनाकडे धरावा. तसेच सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्याबाबत सरकारला समज देण्यात यावी.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी नियम ११० अन्वये विधानसभेत शासकीय ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.#हिवाळीअधिवेशन२०२२ pic.twitter.com/AoN8xFE6pc
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 27, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात ठराव मांडण्याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादावरील ठरावामध्ये ८६५ गावांचा उल्लेख केला आहे मात्र त्यामध्ये बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी या शहरांसह सर्व गावांचा उल्लेख करावा ही ठरावात असलेली चूक सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. याशिवाय या ठरावात अनेक व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या चुका आहेत. त्यामुळे हा ठराव अशा चुकीच्या पद्धतीने मांडला जाऊ नये यासाठी तो व्यवस्थित दुरुस्त करून सभागृहात मांडावा, अशी सूचनाही अजित पवार यांनी केली.