माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh). काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव. कधी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप, कधी सचिन वाझेचे आरोप तर कधी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना अडकविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप. या विविध आरोपांमुळे देशमुख यांचे वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यही अनेकदा चर्चेत आले, वादात सापडले. तुरुंगात गेल्यानंतर तर देशमुख यांचे राजकारण संपले असे बोलले जाऊ लागले. पण ते बाहेर आले, पुन्हा उभे राहिले. राजकारण सुरु झाले. पण आता देशमुख यांचे राजकारण संपवण्यासाठी त्यांच्या घरातूनच तयारी सुरु असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या तयारीत त्यांचा मुलगा सलील देशमुख यांचाच पुढाकार आहे.
अनिल देशमुख यांनी तब्बल पाच वेळा काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2014 सालचा अपवाद वगळता 1995 पासून ते आमदार राहिले आहेत. 2014 मध्ये भाजपच्या आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. पण 2019 मध्ये देशमुख यांनी दमदार कमबॅक करत निवडणूक जिंकली आणि राज्याचे गृह मंत्रीही झाले. मात्र यंदा अनिल देशमुख यांच्या मुलानेच त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिले असल्याची माहिती आहे.
अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी मध्यंतरी शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. काटोल मतदारसंघातूनच सलील यांनी निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीवर पक्षच योग्य तो निर्णय घेईल, असे म्हणत अनिल देशमुख यांनी वेळ मारून देण्याचा प्रयत्न केला. खरं तर सलील यांची आमदार होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. ते जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाच अनेकदा त्यांच्या बोलण्यातून ही इच्छा दिसून आली होती.
2019 च्या निवडणुकीतच सलील यांनी वडिलांच्या विरोधात भाजपाकडून लढण्याची तयारी केली होती. परंतु एका ज्येष्ठ नेत्याच्या मध्यस्थीने सलील यांनी माघार घेतल्याचे सांगिलते गेले. अशात गृह मंत्री असताना देशमुख 100 कोटींच्या वसुली घोटाळ्याच्या आरोपांखाली 13 महिने तुरुंगात होते. याकाळात सलील यांनी संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. मतदारसंघ पिंजून काढला, संपर्क वाढवला. पक्षाची बांधणी केली. यातून त्यांनी एक प्रकारे आगामी निवडणुकीचीच तयारी सुरु केली होती.
आता याच सगळ्याच्या जोरावर सलील यांनी पक्षाकडे थेट उमेदवारीचीच मागणी केली आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच या मनसुब्यापर्यंत ते आले आहेत. अशात शरद पवार यांनी संधी न दिल्यास त्यांनी महायुतीमधूनही चाचपणी सुरु केल्याचे सांगण्यात येते. महायुतीमध्ये काटोल मतदारसंघावर यांनी दावा केला आहे. त्यामुळे सलील अजितदादांकडे गेल्यासही आश्चर्य वाटायला नको. तर मतदारसंघ भाजपला सुटल्यास आशिष देशमुख हेच पुन्हा रिंगणात राहू शकतात. मात्र त्यांनी निवडूणक न लढविण्याची घोषणा केली आहे. ते या घोषणेला जागल्यास सलील यांची भाजपकडूनही निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगितले जाते.
कटोल विधानसभा मतदारसंघात देशमुख विरूद्ध देशमुख हा संघर्ष नवा नाही. 2014 साली अनिल देशमुख यांच्या विरूद्ध पुतण्या आशिष देशमुख यांनी निवडणूक लढली होती. यात पुतण्या विजयी झाला होता तर काकांचा पराभव झाला होता. यंदा पुतण्याच्या जागी थेट मुलानेच शड्डू ठोकण्याची तयारी सुरु केली आहे. यात त्यांच्यापुढे तुतारीसोबतच घड्याळ किंवा कमळाचाही पर्याय आहे. त्यामुळे भविष्यात सलील देशमुख यांनी हाताला घड्याळ बांधले आणि अनिल देशमुख तुतारी वाजवताना पहायला मिळाले तर आश्चार्य वाटायला नको.