Download App

परदेशात जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची ठाण्यामध्ये जोरदार बॅटिंग

ठाणे : ठाण्यामध्ये ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिच राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅंटिंगही केली. ठाणे शहरात टेंभी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्याकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. ही मोठी क्रिकेट स्पर्धा असून यामध्ये अनेक संघ सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने स्वित्झर्लंड येथील दावोस येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले. तिथे जाण्यापूर्वी त्यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले.

एकनाथ शिंदे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील 20 उद्योगांसमवेत चर्चा करणार असून त्यातून राज्यासाठी सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर गुंतवणूकदार तसेच अनेक मोठ्या उद्योगांच्या प्रमुखांबरोबर ते संवाद साधणार आहेत.

या दौऱ्यावेळी 16 आणि 17 जानेवारी असे दोन दिवस ते या परिषदेमध्ये उपस्थित राहणार असून त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारीही असणार आहेत. ही परिषद 20 जानेवारीपर्यंत चालणार असून जागतिक पातळीवरील अनेन बड्या-बड्या उद्योगाबाबत चर्चा केली जाणार आहे.

सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही दावोसला जाणार होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे त्यांनी ऐनवेळी दौरा रद्द केल्याची चर्चा आहे. पण याचवेळी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दोन दिवसामध्येच परत येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस. सरकार आल्यानंतरचा पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे.

Tags

follow us