Download App

वडिलांची इच्छा अन् मविआची ऑफर : संभाजीराजे छत्रपती ‘खासदारकीची’ कोंडी कशी फोडणार?

कोल्हापूर : जुनी जखम अजून विसरलेलो नाही, लोकसभा लढणारच! असा इशारा देत संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. आपली काँग्रेससोबत (Congress) चर्चाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर बातमी आली की संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे, पण अट एकच. पक्षात प्रवेश करा अन् उमेदवारी घ्या. संभाजीराजेंनी मात्र ही अट धुडकावली. स्वराज्य संघटनेशिवाय आपण कोणत्याही पक्षाकडून उभे राहणार नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

इथेपर्यंत सगळे व्यवस्थित होते. मात्र पाच दिवसांपासून अचानक संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल झाले आहेत. पाच दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करुन उद्यापासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करत आहे, असे सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ते अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. नेमके काय घडते आहे कोल्हापूरच्या राजकारणात?संभाजीराजेंच्या डोक्यात काय सुरु आहे? ते नॉट रिचेबल का झाले आहेत? खासदारकीसाठी त्यांची पुन्हा कोंडी झाली आहे का? असे अनेक सवाल सध्या विचारले जात आहेत.

पाहुयात याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे…

संभाजीराजे छत्रपती यांची सगळ्या मोठी अडचण झाली आहे ती संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या खेळीने. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीची ऑफर धुडकाल्यानंतर संजय राऊत यांनी एक ट्विट केले. यात त्यांनी संभाजीराजे यांचे वडील शाहु महाराज छत्रपती यांना राज्यसभेवर बिनविरोध निवडून द्यावे असे सर्वपक्षीयांना आवाहन केले आहे. यानंतर आजही माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वपक्षीयांना याबाबतचे आवाहन केले. पण याच ऑफरमुळे संभाजीराजे यांची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सहाव्या जागेवर अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यावेळी भाजप दोन आणि महाविकास आघाडीच्या चार जागा निवडून येतील असे संख्याबळ होते. यात महाविकास आघाडीतीन तीन पक्ष तीन जागा लढवणार होते. तर चौथ्या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. मात्र या जागेवरुन आपल्याला राज्यसभेत पाठवावे अशी संभाजीराजे यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी शिवसेनेसोबत चर्चा सुरु केली. मात्र त्यांना पक्षात प्रवेश करण्याची अट टाकण्यात आली.

अजितदादांचा खास पठ्ठ्या शरद पवारांसोबत राहिला… जयंत पाटलांकडून अशोक पवारांचे तोंड भरून कौतुक

इथूनच त्यांचे आणि शिवसेनेचे बिनसले. संभाजीराजेंनी शिवसेनेच्या ऑफरला कोणताच प्रतिसाद दिला नाही. वाट बघून शिवसेनेने कोल्हापूरच्याच संजय पवार यांना मैदानात उतरविले. त्यानंतर घोडेबाजारसाठी माझी उमेदवारी नाही. माझे निष्कलंक व्यक्तिमत्व आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे म्हणत संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आणि स्वराज्य संघटनेची स्थापना केली.

मागच्या दोन वर्षांपासून ते याच स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करत आहेत. कार्यकर्ते तयार करत आहेत. निवडणुकीसाठी संघटनेची बांधणी करत आहेत. मराठा आरक्षण, गडकोट किल्ले संवर्धन या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणूकही स्वराज्यमधूनच लढवणार असे घोषित केले होते. पण जर कोणाचा युती, आघाडीचा प्रस्ताव आला तर नक्की करु असे सांगितले. त्यानंतर त्यांनी 2009 मधील पराभावाची जखम विसरलेलो नाही असे सांगत कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात उडी घेतली.

‘देशातील 27 टक्के ओबीसी आरक्षण घालवू’, भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा घणाघात

आता लोकसभा लढविण्याची संभाजीराजे यांची जवळपास सगळी तयारी पूर्ण झाली आहे. अशातच राज्यसभेसाठी वडील शाहू महाराज छत्रपती यांचे नाव पुढे आणून एकाच दगडात अनेक अनेक पक्षी मारण्याची तयारी सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यात पहिले तर छत्रपती घराण्यातील व्यक्तीला राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे श्रेय महाविकास आघाडीला घेता येईल. तसेच, त्यांना संधी दिली तर ऑफर धुडकावणाऱ्या संभाजीराजे यांचे लोकसभेच्या रिंगणातून नाव आपोआपच मागे पडेल. शिवसेनेवर आणि ठाकरेंवर संभाजीराजे यांनी जहरी टीका केली होती. ती टीकाही ठाकरे गट विसरलेला नाही. त्यामुळेच संजय राऊत यांनी शाहू महाराज छत्रपती यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे केले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अशातच वडील शाहु महाराज हेही राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवार यांच्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारत सक्रिय राजकारणात पुनरागमन केले होते. त्यापूर्वी त्यांनी आपली लोकसभा निवडणूक लढविण्याची आणि संसदेत जाण्याची इच्छा होती, असे बोलून दाखविले होते. त्यामुळेच शाहू महाराज छत्रपती यांना राज्यसभेची आलेली ऑफर स्वीकारायची की आपण स्वतः लोकसभेच्या मैदानात उतरायचे यावरून संभाजीराजे यांची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. कदाचित हिच कोंडी फोडण्यासाठी ते गेल्या पाच दिवसापासून नॉट रिचेबल आहेत. त्यांनी आपले कार्यक्रम देखील रद्द केले आहेत.

follow us