Sambhajiraje Chhatrapati : महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे. आझाद मैदानावर (Azad Maidan) या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय. भाजपने (BJP) या सोहळ्याच्या निमंत्रणाची जाहिरात सर्वच प्रमुख वृत्तपत्रात दिली. मात्र, या जाहिरातीमध्ये शाहू महाराजांचा फोटो नसल्याने स्वराज्य पक्षाचे संस्थापक तथा छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज छत्रपती संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी जाहिरातीवर आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे.
शाहू महाराजांना बाजूला सारणे खपवून घेणार नाही, शपथविधीच्या जाहिरातीवरून संभाजीराजे संतापले…
शाहू महाराजांना बाजूला करणे, ही गोष्ट आम्ही खपवू घेणार नाही. भाजपने ही चूक दुरूस्त करावी, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
भाजपने वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, चंद्रशेखर बावनकुळे,आशिष शेलार यांच्या फोटोंसह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही फोटो छापलेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिकारक बिरसा मुंडा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर या महापुरुषांचे फोटो छापण्यात आले. भाजपने निवडणूक प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला होता. मात्र, या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे तसेच शाहू महाराजांना स्थान देण्यात आले नाही. यावरून संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाजपची डोकेदुखी वाढणार! शपथविधी सोहळ्यापूर्वीच अजितदादांनी फडणवीसांसमोर ठेवली ‘ही’ अट
आज माध्यमांशी संभाजीराजे छत्रपतींनी अनेक विषयांवर भाष्य केलं. भाजपच्या जाहिरातीवर बोलताना ते म्हणाले की, महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातींमध्ये महापुरुषांचे फोटो छापले. मात्र, त्यात शाहू महाराजांचा फोटो छापला नाही, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्र घडवण्यात शाहू, फुले, आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांचं योगदान नाकारता येणार नाही. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही, ही गोष्ट महाराष्ट्राला मान्य नाही. शाहू महाराजांना बाजूला सारणे ही बाब आम्ही खपवून घेणार नाही. भाजपने ही चूक दुरुस्त करावी, असा इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्र सुपर पॉवर करण्याकडे लक्ष द्या…
आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी संभाजीराजेंनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. देवेंद्र फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पक्षीय राजकारणापेक्षा महाराष्ट्र सुपर पॉवर कसा करता येईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. नवा महाराष्ट्र घडवण्यात देवेंद्र फडणवीस यांचा हात असावी ही माझी अपेक्षा असल्याचं संभाजीराजे म्हणाले.
निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे विरोधकांनी ईव्हीएमवर शंका घेतली. यावरही संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केले. ईव्हीएमबाबत अनेक पक्षांचे वेगवेगळे तर्क आहेत. त्यामध्ये न पडता आता पुढे कसे जाता येईल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं ते म्हणाले. आता केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे. त्यामुळे प्रलंबित समस्या तातडीने सोडवाव्यात. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा. जे जे शब्द दिले होते, ते आता त्यांनी पुन्हा एकदा सोडवावेत.