सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील (Vishal Patil) यांनी गुलाल उधळला. जिथं निवडून येऊ की नाही हीच धाकधूक होती तिथं पाटलांनी एक लाखांचे लीड घेतले. यात सांगली विधानसभा मतदारसंघातही (Sangli Assembly Constituency) त्यांना 19 हजार मतांचे लीड मिळाले आहे. हक्काच्या मतदारसंघात तब्बल दहा वर्षांनी विजय मिळाल्याने काँग्रेसचे (Congress) कार्यकर्तेही चार्ज झाले आहेत. आता याच लीडच्या आकड्यांवर आगामी विधानसभेचीही गणिते मांडली जात आहेत. दिवंगत माजी आमदार मदन पाटील (Madan Patil) यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) या दोघांनीही इथून तयारीला सुरुवात केली आहे.
त्याचवेळी भाजपकडून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil), जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे (Shivaji Dongare) आणि अन्य काही स्थानिक नेत्यांनी दंड थोपटले आहेत. लोकसभेला भाजप (BJP) मायनसमध्ये गेल्याने आणि गाडगीळ यांच्याबद्दल नाराजी असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याच्या बातम्या आहेत. मात्र गाडगीळ यांना मागच्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाच्या जोरावर आपल्यालाच तिकीट मिळेल असा विश्वास आहे. शिवाय सांगलीमध्ये आपणच लढणार असा दावा ते करत आहेत.
त्यामुळे सांगलीमध्ये यंदा विधानसभेला काय होणार? पाटील कुटुंबामध्ये लोकसभेचा दुसरा अंक बघायला मिळणार का? जयश्री यांना तिकीट मिळाल्यास पृथ्वीराज पाटील काय करणार? सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी राहणार की जाणार? आणि विजयी कोण होणार? (Sangli Assembly Constituency, there may be a fight between Congress’s Jayashree Patil or Prithviraj Patil against BJP’s Sudhir Gadgil)
सांगली म्हणजे वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला. लोकसभेची खासदारकी असो की विधानसभेची आमदारकी असो. पाटील घराण्याचेच वर्चस्व होते. या वर्चस्वाला पहिल्यांदा हादरा दिला तो ‘बिजली’ मल्ल संभाजी पवार यांनी. 1986 मध्ये वसंतदादा पाटील यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सांगली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. यात वसंतदादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव करत संभाजी पवार यांनी राजकारणात दमदार एन्ट्री केली. 1990 आणि 1995 मध्येही पाटील घराण्याचा सांगलीच्या मैदानात पराभव झाला. 2004 मध्ये मदन पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळविला
या दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आल्यानंतर संभाजी पवार भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या वतीने 2009 मध्येही ते याच मतदारसंघातून आमदार झाले. त्यांनी लोकसभेचीही निवडणूक लढवली.
2014 मध्ये सांगलीतून भाजपने सुधीर गाडगीळ यांना तिकीट दिले. सुधीर गाडगीळ म्हणजे संघाचे जुने स्वयंसेवक. त्यांच्या कुटुंबाचा आणि संघाचा अत्यंत जुना आणि घनिष्ट संबंध होता. अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, प्रमोद महाजन असे बडे नेतेही कधीही सांगली दौऱ्यावर आले तरी सगळ्यांचा मुक्काम गाडगीळ यांच्याच घरी असायचा. सुधीर गाडगीळ हे त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. तोपर्यंत त्यांच्याकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. ‘पुरुषोत्तम नारायण गाडगीळ’ ही सोन्याची पेढी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आपण हेच त्यांचे तत्व होते. याच सोन्याच्या पेढीवर त्यांनी जिल्ह्यात एक विश्वासार्ह प्रतिमा तयार केली होती. ही प्रतिमा, मोदी लाट आणि भाजपचे पुरक वातावरण या जोरावर 2014 मध्ये ते आमदार झाले. मदन पाटील यांचा 14 हजार मतांनी पराभव झाला.
2014 मध्ये सांगली शहरासह संपूर्ण जिल्हा भाजपमय झाला होता. लोकसभेला प्रतिक पाटील यांचा पराभव झाला. खासदारकी पहिल्यांदाच भाजपकडे आली होती. सांगली, मिरज, जतमध्ये भाजपचे आमदार निवडून आले होते. महापालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी लक्ष घातले होते. त्यामुळे पाटील गट पुन्हा डोकं वर काढणारच नाही असे बोलले जात होते. अशातच 2015 मध्ये मदन पाटील यांचे निधन झाले. 2019 मध्ये काँग्रेसकडून शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना तिकीट देण्यात आले. त्यात अवघ्या पाच हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उडी घेतली आहे. गतवेळी निवडणूक लढण्यासाठी आपली मानसिक तयारी नव्हती. त्यामुळे आपणच पृथ्वीराज पाटील यांच्या तिकीटासाठीसाठी आग्रह धरला होता. आता यंदा त्यांनी थांबून आपल्याला पाठिंबा द्यावा असे त्यांचे मत आहे.
यंदा विशाल पाटील यांना सांगली विधानसभा मतदारसंघातून 19 हजारांचे लीड आहे. त्यामुळे काँग्रेस चार्ज झाली आहे. याच लीडवर विधानसभेचीही गणिते मांडली जात आहेत. जयश्री पाटील यांनी स्व. मदन पाटील युवा मंचच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली आहे. आतापर्यंत विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांच्यात कौटुंबिक वाद होते. पण लोकसभेपूर्वी हे वाद मिटले आणि त्यांनी विशाल पाटील यांना उघड पाठिंबा जाहीर केला. आता विशाल पाटील यांचेही जयश्री पाटील यांच्या उमेदवारीला समर्थन आहे. एका घरात दोन तिकीटे कशी द्यायची? असा प्रश्नच उभा राहु नये म्हणून विशाल पाटील वारंवार आपण अपक्ष खासदार आहोत याची आठवण करुन देत आहेत. त्याचवेळी पृथ्वीराज पाटील यांनी संपूर्णपणे माघार घेतली आहे असेही नाही. गत निवडणुकीत हाता-तोंडाशी आलेला घास दुरावला होता. यंदा थोडा जोर लावल्यास आमदार होऊ असा आशावाद त्यांना आहे. त्यामुळे यावेळी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवायची आणि जिंकायचीच यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
मात्र जयश्री पाटील यांनी वास्तविक परिस्थिती समजून पावलं टाकणं गरजेचं आहे. विशाल पाटील यांना 2019 च्या निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघातू 71 हजार 709 मते होती. त्यात यंदा 33 हजार 476 मतांची वाढ होऊन एक लाख पाच हजार 185 मते मिळाली. मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना याच मतदारसंघातून 32 हजार 780 मते मिळाली होती. साधारण तेवढ्याच मतांचे दान विशाल पाटील यांच्या पदरात वाढल्याचे दिसून येते. स्थानिक पत्रकारांच्या मते, वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याने ही मते विशाल पाटील यांच्याकडे वळली. शिवाय या वाढलेल्या मतांमध्ये त्यांच्यासाठी तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा मोठा वाटा होता. कदाचित विशाल पाटील काँग्रेसकडून उभे राहिले असते तर पराभूत झाले असते.
त्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. 2019 मध्ये संजय पाटील यांना सांगली विधानसभा मतदारसंघातून 92 हजार 541 मते मिळाली होती. यंदा त्यात 6 हजार 548 मतांची घट होऊन 85 हजार 933 मते मिळाली. त्याचवेळी आमदार सुधीर गाडगीळ यांना गत विधानसभेला 93 हजार 064 मते होती. म्हणजेच या मतांपेक्षा सात हजार मते संजय पाटील यांना कमी मिळाली. आता जी मते कमी झाली ती संजय काका पाटील यांच्याबद्दलच्या नाराजीमुळे होती. सांगली विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत संजय पाटील यांच्या जनसंपर्काचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला. रेल्वे उड्डाणपूल, पाणी प्रश्नासह शहरी भागातील समस्यांकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही.