Sanjay Raut on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाना उधान आले होते. मात्र आज दुपारी अजित पवार यांनीच सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे. आपण राष्ट्रवादीत आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) टिकावी, राहावी आणि भक्कम व्हावी यासाठी आम्ही चौकीदारी करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की अजित पवारांनी माझ्यावर टीका केली की नाही हे माहिती नाही. अजित पवारांच्या बदनामीची मोहिम सुरु झाली त्यावर आम्ही भूमिका मांडली. जेव्हा शिवसेनेत फूड पाडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत सगळ्यांनी भूमिका घेतली होती. ती भूमिका आम्ही राष्ट्रवादीच्या बाबतीत घेतली त्यात चुकीचे काय अशा शब्दात संजय राऊतांनी अजितदादांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
…तर तुम्ही सांगाल तिथं येतो, आमदार जगतापांचं राणेंना ओपन चॅलेंज
संजय राऊत पुढं म्हणाले की आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. महाविकास आघाडी टिकावी, राहावी आणि भक्कम व्हावी यासाठी आम्ही चौकीदारी करतो. त्यात अजित पवारसुद्धा आहेत. भाजपाची कारस्थाने रोज आमच्याविरोधात होतायेत ती उधळणे आमचे काम आहे. अजित पवारांबाबत ज्या अफवा पसरवण्यात आल्या त्याला पूर्णविराम मिळाला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर आहे. आरजेडी, तृणमूल काँग्रेसवरही दबाव आणून पक्ष फोडले जातायेत हे सत्य आहे. त्यात लपवण्यासारखे काय आहे? या कारस्थानाविरोधात आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन खंबीरपणे लढणे गरजेचे आहे. राजकारणात काहीही होऊ शकते, प्रत्येकाचे दिवस येतात असं सांगत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.