सांगली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गेले दोन दिवस ते कोल्हापूर येथे होते. आज ते सांगलीला आले आहेत. यावेळी त्यांची सभा देखील झाली. सभेनंतर माध्यमांंशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सांगलीमध्ये शिवसेनेला प्रचंड मोठा प्रतिसाद दिसतो आहे. यावरुन असे वाटते की आम्ही सांगलीचा भाग भाजपला आंदण दिला होता, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.
संजय राऊत यांचे सांगलीमध्ये जोरदार स्वागत झाले. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे. काल कसब्याचा जो निकाल लागला तोच निकाल 2024 साली सांगली व मिरजेत लागेल, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे. तसेच कसब्यात गेली 25 वर्षे भाजपाचा जो विजय होतो आहे तो, शिवसेनेच्या मदतीमुळे होत होता. पण शिवसेना त्यांच्याबरोबर नाही हे कालच्या निकालाने स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Eknath Shinde: अजितदादांना सहशिवसेना प्रमुखपद देता यायचं नाही!
याचबरोबर खरी शिवसेना कोणती हे जर ठरवायचे असेल तर ते जनता ठरवेल. निवडणुकीच्या माध्यमातून हे स्पष्ट होईल की खरी शिवसेना कोणती आहे, असे आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिले आहे. तसेच जर शिवसेना शिंदेंच्या बरोबर असती तर कसब्यामध्ये भाजपचा विजय झाला असता, असे राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान राऊतांनी आज सकाळी देखील भाजपवर सडकून टीका केली होती. कसब्यामध्ये भाजपचा पराभव झाल्याने त्यांना आता घाम फुटला आहे. त्यांना आता झोप लागत नाही, त्यांची थोडी फार जी झोप होती ती देखील उडाली आहे, अशा शब्दात राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपचा विजय झाला असे मी मानत नाही. त्याठिकाणी आमच्याच उमेदवाराला बंडखोर म्हणून उभे केले होते, असे राऊत म्हणाले होते.