अहमदनगर : ’22 वर्ष काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत फिरून काँग्रेसचा प्रचार-प्रसार करत छोटे-मोठे कार्यकर्ते जोडले. आमच्या कुटुंबातील निर्णय होईपर्यंत पदवीधरची उमेदवारी जाहीर करू नका. असे काँग्रेस श्रेष्ठींना सांगत होतो. परंतु त्यांनी ती जाहीर केली आणि मग मात्र अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला.’ असं म्हणत नाशिक पदवीधक मतदारसंघातून अपक्ष उभे राहणाऱ्या सत्यजित तांबेंनी आपण अपक्ष उभं राहण्याचा निर्णय का घेतला ? याचं कारण सांगितलं.
हा आमच्या कुटुंबाचा निर्णय असून या निर्णयाचे रूपांतर डॉ. सुधीर तांबे यांच्या माध्यमातून माझ्या विजयात होईल असं प्रतिपादन देखील यावेळी सत्यजित तांबे यांनी केलं. देवळाली प्रवरा बाजार तळावर अजय खिलारी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित पदवीधर मतदारांच्या बैठकीत तांबे बोलत होते.
सत्यजित तांबे म्हणाले की, अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर आपण अनेक चर्चा, तर्क-वितर्क, घडामोडी प्रसार माध्यमांतून ऐकल्या व वाचल्या असतील. आता मी अपक्ष नव्हे तर सर्व पक्षीय उमेदवार झालो आहे. कारण राज्यातील सर्व पक्षीय ताकत मनाने माझ्या सोबत आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले. यावेळी मात्र काँग्रेसने केलेल्या निलंबनाच्या कारवाई बाबत बोलण्यास मात्र सत्यजित तांबे यांनी विनम्रपणे नकार दिला.
यावेळी अजय खिलारी, डॉ. अशोक मुसमाडे , नानासाहेब कदम, सतीश वाळुंज, कृष्णा मुसमाडे, दीपक पठारे, डॉ.भागवत वीर, संजय चव्हाण, , दीपक ढुस, बाळासाहेब लोखंडे, बाळासाहेब आढाव, राजेंद्र बोरुडे , विनोद मोरे, किरण कडू, गोपाल जोशी, सूर्यभान कदम, दत्तात्रय मुसमाडे तसेच पत्रकार अशोक काळे, गोविंद फूणगे आदी उपस्थित होते.
दरम्यान सध्या नाशिक पदवीधक मतदारसंघातून अपक्ष उभे राहणारे सत्यजित तांबे यांनी मतदारसंघात आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यासाठी ते अहमदनगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.