Download App

‘परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावचं लागत’ म्हणत सत्यजित तांबेंचा मोठा निर्णय

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातून पक्षाविरोधात बंड करून अपक्ष निवडणूक अर्ज भरणारे सत्यजित तांबे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. तर आता सत्यजित तांबेंवरही पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सत्यजित तांबेंवर कारवाई करू शकतात. मात्र यादरम्यान सत्यजित तांबेंनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटर आणि फेसबुक या आपल्या सोशल मिडीयावरून कॉंग्रेसचा उल्लेख हटवला आहे.

याचबरोबर त्यांनी ‘वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावचं लागत’ असं कव्हरपेज देखील त्यांनी फेसबुक आणि ट्विटर या आपल्या सोशल मिडीयावर ठेवला आहे. त्यामुळे पक्षाविरोधात बंड करून अपक्ष निवडणूक अर्ज भरणारे सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाना दुजोरा मिळत असल्याचे देखील बोलले जात आहे.

या अगोदरच सोशल मिडीयावर सत्यजित तांबे यांच्या फोटोसह एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्याबरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे. माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल. – सत्यजित तांबे’. या पोस्टमुळे सत्यजित तांबे यांना नेमका काय संदेश द्यायचा आणि कोणाला द्यायचा राजकीय वर्तुळात नवनवीन चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे सत्यजित तांबेंवरही पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे, शुभांगी पाटील व सुभाष जंगले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या शुंभागी पाटील यांनी अखेर तीन वाजेपर्यंत आपला अर्ज मागे घेतलाच नाही. मात्र भाजपचे समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. या मतदारसंघात भाजपने आपला अधिकृत उमेदवार तर दिलाच नाही, तर भाजप समर्थकांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे भाजपकडून तांबेसाठी मैदान मोकळे झाले आहे.

Tags

follow us