अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातून पक्षाविरोधात बंड करून अपक्ष निवडणूक अर्ज भरणारे सत्यजित तांबे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. तर आता सोशल मिडीयावर सत्यजित तांबे यांच्या फोटोसह एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्याबरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे. माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल. – सत्यजित तांबे’.
या पोस्टमुळे सत्यजित तांबे यांना नेमका काय संदेश द्यायचा आणि कोणाला द्यायचा राजकीय वर्तुळात नवनवीन चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे सत्यजित तांबेंवरही पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. याअगोदर पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करुन शिस्तभंग केल्याप्रकरणी डॉ. सुधीर तांबे यांच्यावर कॉंग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसकडून नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मदेखील पाठवण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी त्यांनी आपल्या मुलाचा अपक्ष अर्ज दाखल केला. आपल्या मुलाचा अर्ज दाखल केल्यानंतर सत्यजित तांबे यांनी आपण भाजपची मदत घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर तांबे पिता-पुत्रांनी कॉंग्रेस पक्षाशी दगाफटका केला, फसवेगिरी केल्याचंही नाना पटोले यांनी म्हंटलं होतं.