Shaina NC Apology Balasaheb Thackeray Photo Issue : शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर शायना एन. सी. यांनी आपली भूमिका स्पष्ट करत बाळासाहेबांच्या चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे. बाळासाहेबांचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज! 12 व्या वेतन कराराने भरघोस पगारवाढ मिळणार
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकाचा निषेध केला. यावेळी पुस्तक फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र, याचवेळी शायना एन. सी. यांच्या हातून अनावधानाने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही फाडला गेला. या घटनेनंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले. या प्रकारामुळे दोन्ही शिवसेना गटांमधील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
‘बाळासाहेब माझ्यासाठी पितृतुल्य आणि देवतुल्य’
या घटनेवर स्पष्टीकरण देताना शायना एन. सी. यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, लहानपणीच त्यांची बाळासाहेबांशी भेट झाली होती. ते त्यांच्या वडिलांचे जवळचे मित्र होते आणि त्यांच्या कुटुंबाशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या लग्नासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीही बाळासाहेब उपस्थित होते.
CJP ने मोठी मोहीम हाती घेतली; ‘या’ मोहिमेमुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढणार?
बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशातील मोठे नेतृत्व होते. त्यांची देशभक्ती, हिंदुत्वावरील निष्ठा आणि स्पष्ट विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेतही आपण बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला होता. मात्र, आपल्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘भावना दुखावल्या असतील तर मनापासून माफी मागते’
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आपल्याला माहीत आहे. आपल्यासाठीही ते केवळ नेते नव्हते, तर दैवत होते. आपल्या कृतीमुळे शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मनापासून माफी मागते, असे शायना एन. सी. यांनी स्पष्ट केले.
मात्र, या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. बाळासाहेबांवरील आपले प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे त्या म्हणाल्या. सत्ता आणि स्वार्थासाठी त्यांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी आपल्याला बाळासाहेबांचे विचार शिकवू नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, शायना एन. सी. यांच्या माफीनंतरही ठाकरे गटाची आंदोलनाची भूमिका कायम राहते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व.
मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते.
बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे.
कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते.बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की—बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही!
सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि काही ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा!
जय हिंद, जय महाराष्ट्र! @Shivsenaofc— Shaina Chudasama Munot (@ShainaNC) November 19, 2026
