Sharad Pawar : बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यावर आता देशात ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. (Sharad Pawar) महाराष्ट्रातही काही ठिकाणी त्याचे पडसाद पाहायला मिळाले. यानंतर राज्यात काल तणावपूर्ण परिस्थिती दिसली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात जे काही घडले, ते राज्याच्या हिताचं नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करायची असेल तर समाजकारण आणि राजकारणातील व्यक्तींनी सयंमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहिल, याबद्दलची खबरदारी घ्यावी, एवढेच मी सांगू इच्छितो अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृहखात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल. मात्र आज मला शांतता आणि सौहार्द याचं जास्त महत्त्व वाटतं. म्हणून मी अन्य बाबींवर भाष्य करू इच्छित नाही. शांतता कशी प्रस्थापित होईल, याबाबत मी अधिक आग्रही आहे. अन्य काही देशात घडणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या राज्यातील लोकांचे जीवन संकटात येईल, असे काही करू नये हे माझं आवाहन आहे असही पवार यावेळी म्हणाले आहेत.
वादग्रस्त वक्तव्यावरून गुन्हा दाखल, रामगिरी महाराज म्हणाले,परिणामांना सामोरं जाण्यास तयार
भारताच्या स्वातंत्र्य दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना संबंध देशाच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात, अशी भूमिका मांडली. ती भूमिका मांडून १२ तास होत नाहीत, तोवरच चार राज्यांची निवडणूक वेगवेगळी जाहीर झाल्याचं पाहायला मिळालं. संबंध देशाची निवडणूक एकत्र घेण्याची भूमिका मांडत असताना त्यांनी झारखंड व महाराष्ट्रात निवडणूक जाहीर केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणात विसंगती दिसत आहे, एवढंच याप्रसंगी बोलू शकतो, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.