शरद पवार एनडीएमध्ये आल्यास महाराष्ट्राचा राजकीय ‘भूगोल’ कसा असेल ?

शरद पवार एनडीएमध्ये गेल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात. जाणून घेऊ या राजकीय समीकरण.

Sharad Pawar

Sharad Pawar

Sharad Pawar : मतदारसंघ पूनर्रचना विधेयकाला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाठिंबा जाहीर केलाय. यावरून शरद पवार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडू शकतात. त्यातून इंडिया आघाडी धोक्यात तर येईलच पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला धोका निर्माण होईल. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये गेल्यास राज्याचे राजकारण कसे असेल, कुणाला किती फायदा होईल, कुणाला काय तोटा होईल हे याच व्हिडिओतून पाहुया.


मला आता निर्णय आणि टाइमलाईन पाहिजे! बाबासाहेबांच्या स्मारकावरून फडणवीस आक्रमक

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात भाजप, शिवसेना-शिंदे आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट यांची महायुती आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना-उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशी महाविकास आघाडी आहे. शरद पवारांनी एनडीएमध्ये प्रवेश केला, तर केवळ पक्षांची युती बदलणार नाही, तर राज्यातील अनेक राजकीय गणितही बदलणार आहेत.


महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात बळ मिळेल

शरद पवार यांचे राजकारण हे पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही भागापुरतेच मर्यादित आहे. अनेकदा तर अडीच जिल्ह्यांचा पक्ष असे राष्ट्रवादीला हिणवले गेलेले. पण भाजपच्या लाटेतही पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गट काही प्रमाणात टिकून राहिलाय. लोकसभेचा विचार केल्यास शरद पवार गटाचे आठ खासदार आहेत. त्यातील चार खासदार हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. विदर्भातून केवळ अमर काळे यांच्या रुपात एक खासदार आहे. तर दिंडोरी, बीड, भिंवडीत शरद पवार गटाचे खासदार आहेत. तर विधानसभेत दहा आमदार आहेत. त्यातही आठ आमदार पश्चिम महाराष्ट्रातील असून, सर्वाधिक चार आमदार सोलापूर जिल्ह्यातील आहेत. पुणे, बारामती, सातारा, सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगर या पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक नेटवर्क आहे. सहकार क्षेत्रातील नेते, स्थानिक संस्थांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जाळे भाजपच्या राजकीय विस्ताराला मदत करू शकते.

त्यावेळी झोपला होता का?”महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेवरून देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल!


अजित पवार गटाचे राजकीय भवितव्य काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची चर्चा ही या संभाव्य घडामोडीतील सर्वात महत्त्वाची बाजू असेल. शरद पवार एनडीएमध्ये गेले तर अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार का ? की वेगवेगळे म्हणून महायुतीत राहणार, हा प्रश्न निर्माण होणार आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास पक्षाची संघटनात्मक ताकद वाढू शकते. नेतृत्व कोणाचे, पक्षातील महत्त्वाची पदे कोणाकडे आणि आगामी निवडणुकीत उमेदवारी कोणाला, यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे. विशेषत: स्थानिक पातळीवर वर्षानुवर्षे एकमेकांविरोधात लढलेल्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणणे सोपे नसेल.

महाविकास आघाडीला मोठा धक्का; काँग्रेसला नवी संधीही
शरद पवार यांच्यामुळेच 2019 ला महाविकास आघाडी अस्तित्वात आले. महाविकास आघाडीचे शिल्पकार तेच मानले जातात. तसेच राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणासाठी महत्त्वाचा दुवाही शरद पवार हेच राहिले आहेत. त्यामुळे तेच भाजप प्रणित एनडीएमध्ये दाखल झाल्यास महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी धोक्यात येईल. त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस बरी ताकद आहे. सोलापूरमधून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील अशी काँग्रेसची ताकद आहे. पण विश्वजित पाटील हे एकमेव आमदार आहेत. तर कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांसाठी सर्वांना नडणाऱ्या हुकमी एक्का काँग्रेसकडे आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पाळुमुळे पसरायला काँग्रेसला संधी राहिल.

सुप्रिया सुळे यांची भूमिका निर्णायक ठरणार?
शरद पवारांच्या संभाव्य राजकीय निर्णयात सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. कारण शरद पवार यांचे वय पाहाता ते कधीही राजकारणातून निवृत्ती घेऊ शकतात. त्यात शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार हे भाजपबरोबर जाण्यास इच्छुक नाहीत. अशा वेळेस ते वेगळा निर्णय घेऊ शकतात.


काँग्रेस-ठाकरे गट एकत्र राहिल का ?

महाविकास आघाडीतील शिल्पकार दूर झाल्यास विरोधी आघाडीची ताकद आणि मतांचे एकत्रीकरण कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यात शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष निर्माण होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पण व्होट बँकचा विचार केल्यास ठाकरे व काँग्रेस एकत्र राहिल्यास फायदे होऊ शकतात. ठाकरे गट मोठ्या शहरात जम बसवेल, तर काँग्रेस भागात आपला जनाधार निर्माण करू शकते. तसेच ठाकरे गटाकडे शहरी मुस्लिम व्होट बँकही वळाली असल्याचे आपण मागील निवडणुकीत पाहिले आहे.

फडणवीसांसमोर सत्तेचा समतोल राखण्याचे आव्हान
शरद पवार एनडीएमध्ये आले तर राज्यातील भाजपचे नेतृत्व, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महायुतीचा समतोल राखण्याचे चॅंलेज असणार आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात आधीच सत्तेचे वाटप आहे. त्यात शरद पवारांच्या गटाची भर पडल्यास मंत्रिपदं, जिल्ह्यांतील नेतृत्व आणि निवडणुकीतील जागावाटपावरून नवे संघर्ष निर्माण होऊ शकतो. पण आधीच तीन पक्षांच्या सत्तेमध्ये राजकीय हेवेदावे दिसून येत आहे. त्यात शरद पवारांची भर पडल्यास वेगळे राजकीय समीकरणे ही उदयास येऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. राजकारण कधीही काही होतं. त्यामुळे भविष्यातील राजकारण कसे असेल ते आपण भविष्या काळावरच सोडून देऊ या.

Exit mobile version