Download App

Sharad Pawar: ‘… तर पाणी मिळणार नाही’ बारामतीकरांना धमकी, शरद पवारांनी वाचली चिठ्ठी

  • Written By: Last Updated:
Sharad Pawar News :  लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज शरद पवार यांनी उंडवडी व सुपे येथे जाहीर सभा घेतली.  त्यानंतर त्यांनी बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला. शरद पवार यांनी या दौऱ्यात जनाई-शिरसाई पाणी योजनेवर देखील भाष्य केले. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात ही योजना चर्चेत आहे. तर आता या योजनेवरून अजित पवार – शरद गटात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
 या दौऱ्यात शरद पवार यांनी उंडवडी कडेपठार, कारखेल, देऊळगाव रसाळ, सुपे येथे दौरा केला. तर उंडवडी आणि सुपे येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी जनाई-शिरसाई योजनेच्या कामाची जबाबदारी मी ज्यांच्यावर दिली होती, त्यांनी ती पार पाडली नाही असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लावला. मी 20 वर्ष स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हते मात्र आता लक्ष घालून मी माझी संपूर्ण जबारदारी पार पाडेन, जिरायत भागाने नेहमी मला प्रेम केलं आहे त्यामुळे या भागातील प्रश्न सोडवणे माझी जबरदारी असल्याचे पवार म्हणाले.
 बारामती तालुक्याच्या जिरायत भागातील शेती सिंचनासाठी जनाई-शिरसाई योजना राबवण्यात आली होती मात्र योजना सुरु होताच या योजनेसंबंधी अनेक प्रश्न निर्माण झाले. यामुळे सुपे येथे या विषयावरून 2-3 महिण्यापुर्वी उपोषण झाले होते. खा. सुप्रिया सुळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अजित पवार यांनी देखील उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती.
 जनाई-शिरसाई योजनेचा प्रश्न तापत असल्याने अजित पवार यांनी सुप्यात शेतकरी मेळावा घेतला होता आणि हे काम मीच करू शकते, दुसरा कोणीही मायचा लाल हे काम करू शकत नाही असा दावा केला होता. तर शरद पवार यांनीही त्याला प्रत्युत्तर देत, ही योजना माझ्या सहीने मार्गी लागल्याचे सांगितले होते. लोकसभा निवडणुकीत जिरायती भागातील मते निर्णायक असल्याने अजित पवार यांनी या प्रकरणात मंत्रालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत उपसा सिंचन योजना सौर उर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला होता. तसेच उपोषणकर्त्यांना आश्वासने देत त्यांचे उपोषण मागे घेण्यात मोठी भूमिका बजावली होती. या घडामोडीनंतर आता जिरायती भागात शरद पवार यांनी दौरा केल्याने सध्या या योजनांचा श्रेयवाद रंगला आहे.
आज सुपे येथील सभेत शरद पवार यांना उपस्थितांमधून एक चिठ्ठी देण्यात आली. या चिठ्ठीमध्ये जर तुम्ही घड्याळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जाणार नाही असा मजकूर होता. तुम्ही अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे, या शब्दात त्यांनी अजित पवार गटाचा समाचार घेतला.
follow us