पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. त्यांनी पक्षावरच दावा ठोकला. त्यानंतर शरद पवारांनी बंडाळी करणाऱ्या नेत्यांच्या संघात सभा घ्यायला सुरूवात केली. शरद पवार गटाकडून सातत्याने अजित पवार गटातील नेत्यांना लक्ष्य केलं जातं. दरम्यान, आता खुद्द शरद पवार (Sharad Pawar) हे पुण्यात रोड शो (Road show) करणार आहेत. ते 27 ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर असणार आहेत. याच दिवशी ते पुण्यात रोड शो करणार असल्याची माहिती शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी 2 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले. याला आता जवळपास दोन महिने उलटले आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दोन्ही गटांकडून सभा-उत्तरसभा घेतल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी पुण्यात आणि बारामतीत रोड शो करून शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्यानंतर आता शरद पवार गटही पुण्यात रोड शो करत आहे. 27 ऑक्टोबरला हा रोड शो होणार असल्याची माहिती आहे.
Engineer Day; शरद पवारांनी सांगितल्या किल्लारी भूकंप काळातील आठवणी
येत्या काही दिवसांत पुण्यातील शहराध्यक्ष आणि अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. याच बैठकीत या रोड शोचं आणि सभेचं पुढील नियोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील सारसबागेसमोरील गणेशकला क्रीडा सभागृहात शरद पवार यांची सभा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांपाठोपाठ आता शरद पवारही रोड शो करून पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत.
शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीही शरद पवारांच्या रोड शोची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शरद पवारांचा पुण्यातील रोड शो कसा होतो आणि रोड शोचं सभेत रुपांतर होणार असल्यानं शरद पवार सभेत अजित पवारांवर निशाणा साधणार का? कि, ते पक्षबांधणीचा प्रयत्न करणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाचे कार्यालय
एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या आमदारांना निलंबित करण्यासाठी शरद पवार गट आक्रमक झाला आहे, तर दुसरीकडे अजित पवारांचा बालेकिल्लला समजलल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गट दोन हात करण्याच्या तयारीत आहे. शरद पवार यांच्या गटाने पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र कार्यालय उभे केले आहे. काळेवाडी परिसरात या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.