Download App

Ground Zero : टोपेंचा ‘षटकार’ हुकणार? ठाकरेंचाच शिलेदार खिंडीत गाठणार

घनसावंगी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे हिकमत उधाण विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांच्या लढत होणार?

  • Written By: Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडली. दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह चाळीसहून अधिक आमदार हे अजितदादांबरोबर गेले. राजकीय संकटाच्या काळात जयंत पाटील हे शरद पवारांबरोबर राहिले. पण पवार यांच्याबरोबर एकनिष्ठ राहिलेला आणखी एक नेता म्हणजे मराठवाड्यातील राजेश टोपे (Rajesh Tope) हे.

दोन साखर कारखाने, शिक्षण संस्थांच्या जोरावर पूर्वीचा अंबड आणि सध्याच्या घनसांगवी मतदारसंघात राजेश टोपे हे सलग पाच टर्म आमदार राहिलेले. तीन वेळा मंत्रिपद भूषविलेले टोपे हे यंदा आमदारकीसाठी षटकार मारण्याच्या तयारीत आहेत. पण महायुतीकडून प्रबळ उमेदवारी टोपेंविरोधात देऊन त्यांना खिंडीत गाठले जाईल का, अजित पवार (Ajit Pawar) यांची भूमिका काय असेल, मनोज जरांगे यांच्यामुळे चर्चेत आलेले अंतरवली सराटी गाव हे याच विधानसभा मतदारसंघात आहे. त्याचा काय परिणाम होईल? (Shiv Sena’s Hikmat Udhan will fight against NCP’s Rajesh Tope in Ghansawangi Assembly Constituency)

पाहूया, लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो राजकारणाच्या विशेष सिरीजमध्ये …

मराठवाड्यातील आणखी एक मातब्बर घराणे म्हणजे टोपे कुटुंब. राजेश टोपे यांचे वडिल स्वर्गीय अंकुशराव टोपे हे काँग्रेसमध्ये होते. ते 1972 मध्ये काँग्रेसकडून आमदार झाले. तर 1991 मध्ये ते जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. त्यांनी साखर कारखाना, शिक्षण संस्था काढत आपले राजकारण पक्के केले. त्यानंतर 1999 मध्ये राजेश टोपे राजकारणात आले. 1999 ते 2004, 2009, 2014, 2019 असे तब्बल पाच टर्म आमदार राहिले. राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आरोग्य खाते अशी मंत्रिपदे त्यांनी सांभाळली.

2009 मध्ये मतदारसंघ पुर्नरचनेत अंबड मतदारसंघ जावून घनसांगवी असा मतदारसंघात तयार झाला. या मतदारसंघात जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका, जालना तालुक्यातील विरेगांव आणि पाचण वडगांव ही महसूल मंडळे, अंबड तालुक्यातील वडी गोद्री आणि गोंदी ही महसूल मंडळे आहेत. पण हा विधानसभा मतदारसंघ लोकसभेला परभणी मतदारसंघात मोडतो.  मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यानंतर पहिलीच निवडणूक राजेश टोपे यांना काहीशी जड गेली. टोपेंविरोधात शिवसेनेने अर्जुन खोतकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी टोपे हे 24 हजार मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीच्या तिकीटावर टोपे यांना 1 लाख 4 हजार 206 मते मिळाली होती. तर खोतकर यांना 80 हजार 999 मते मिळाली होती.

सत्तारांची नजर चौथ्या विजयावर; पण दानवेंच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग

पण 2014 च्या निवडणुकीत टोपे यांनी सहज विजय मिळविला होता. सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे मतविभाजानाचा फायदा टोपेंना झाला होता. ते सुमारे 45 हजारांच्या मताधिक्यांनी विजयी झाले. टोपेंना 98 हजार 206 मते मिळाली होती. 1985 आणि 1990 मध्ये काँग्रेसकडून आमदार झालेल्या विलास खरात (Vilas Kharat) यांना भाजपने (BJP) मैदानात उतरविले होते. तर शिवसेनेकडून (Shivsena) हिकमत उधाण हे उमेदवार होते. खरात यांना 54 हजार 554 मते मिळाली होती. तर उधाण हे 45 हजार 657 मते मिळून तिसऱ्या क्रमाकांवर राहिले होते.

2019 ची निवडणूक राजेश टोपेंसाठी सर्वाधिक कठीण राहिली. उद्धव ठाकरे यांचा शिलेदार हिकमत उधाण यांनी टोपेंनी जबरदस्त फाइट दिली होती. त्यावेळी राजेश टोपे हे अवघ्या साडेतीन हजार मतांनी विजयी झाली होती. मंत्रीपद आणि सर्व स्थानिक सत्ता हातात असताना टोपेंनी ही लढत जड गेली. राजेश टोपेंना 1 लाख 7 हजार 7 हजार 849 मते मिळाली होती. तर उधाण यांना 1 लाख 4 हजार 440 मते मिळाली होती. त्यामुळे ही लढत राज्यात गाजली होती.

लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलनकर्ते यांच्यात चकमक झाली. त्यात पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. तसेच हवेत गोळीबार केला होता. या चकमकीत अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले होते. त्यावेळी सर्वात आधी या गावात आमदार राजेश टोपे हे गेले होते. त्यावरून भाजपने राजेश टोपे यांच्यावर आरोप केले होते. तसेच तेच आंदोलकांना मदत करतात, असा आरोपही झाला होता. राजेश टोपे यांचा साखर कारखाना अंतरवली सराटी गावापासून जवळ असल्याने तेथे राहण्याची सोय व नाष्टाची सोय केली होती, असे टोपे यांनी जाहीर करून टाकले. परंतु आंदोलनामागे माझा हात असल्याचे सिद्ध करून दाखविले तर मी राजकीय संन्यास घेईल, असे आव्हान टोपे यांनी दिले होते.

भुमरेंच्या किल्ल्याला सुरुंग लागणार? जुन्या शिलेदाराला ठाकरेंची ताकद

लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास, ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव हे परभणी मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा पराभव केला. घनसांगवी मतदारसंघातून संजय जाधव यांना तीस हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे राजेश टोपे यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. आता ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा या सूत्रानुसार महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरदचंद्र पवार पक्षाला जाईल. त्यामुळे राजेश टोपे हेच उमेदवार असणार हे नक्की. पण यामुळे ठाकरे गटाचे स्थानिक नेते आणि टोपे यांचे पारंपरिक विरोधक हिकमत उधाण यांची कोंडी झाली आहे.

तर महायुतीमध्ये अजित पवार गटाकडून प्रबळ असा दावेदार नाहीत. त्यामुळे अजित पवार गट या जागेसाठी जास्त जोर लावणार नाही. शिवसेना किंवा भाजपकडूनच ही जागा मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. एकनाथ शिंदे गटाला ही जागा गेल्यास उधाण हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि उमेदवार राहतली. भाजपकडून माजी आमदार विलास खरात, सतीश घाटगे हे दोघे उमेदवारीसाठी इच्छुक आहे. निवृत्त सनदी अधिकारी मधुकर अर्दड हेही विधानसभेची तयारी करत आहेत. ते मराठा आंदोलनामध्ये अग्रेसर होते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची रणनिती ठरविण्यात अर्दड हे सहभागी होते. त्यामुळे तेही रिंगणात उतरू शकतात.

तिरंगी व चौरंगी लढत झाल्यास टोपे यांना ही निवडणूक सोपी जाईल. परंतु सरळ-सरळ दुरंगी लढत झाल्यास टोपींसमोर अडचणी उभ्या राहू शकतात. गेल्या वेळचे विधानसभेची निवडणुकीचा अनुभव पाहता टोपे हे यंदा जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न करतील हे नक्की.

follow us