संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांची पुण्यभूमी, भलेमोठे जायकवाडी धरण, गोदावरी नदीमुळे तयार झालेला ऊस पट्टा, दोन साखर कारखाने, कापूस उत्पादनातून आलेली सुबत्ता असे चित्र असलेला मतदारसंघ म्हणजे पैठण विधानसभा. पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला होता. पण 1995 ते 2019 पर्यंत एक अपवाद वगळता येथील मतदारांनी कायमच शिवसेनेलाच (Shivsena) साथ दिली आहे.
त्यामुळेच साखर कारखान्यावर स्लीपबॉय म्हणून काम केलेले संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) तब्बल पाच टर्म आमदार होऊ शकले. दोनवेळा मंत्री राहिले. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीही झाले आणि यंदा खासदारही बनले. आता त्यांच्यानंतर हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवण्याचे आव्हान स्वतः भुमरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापुढे आहे. तर मतदारसंघ भुमरेंपेक्षा आपल्याला आणि शिवसेनेला जास्त मानतो हे दाखवून देण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. (Who will be the candidate from Shiv Sena (UBT) against Vilas Bhumre of Shiv Sena in Paithan Assembly Constituency)
या मतदारसंघावर 1990 पर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते. पण 1990 मध्ये शिवसेनेचे बबनराव वाघचौरे या मतदारसंघात निवडून आले. त्यानंतर या मतदारसंघावर शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांचाच बोलबोला राहिला आहे. 2009 चा अपवाद वगळता ते 1995, 1999, 2004, 2014 आणि 2019 असे पाच वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. शिवसेनेच्या बंडात ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आणि मंत्रीही झाले. आता खासदार आहेत.
तीन टर्म आमदार राहिलेल्या संदीपान भुमरे यांना 2009 ला पहिला झटका बसला. आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे घेत संजय वाघचौरे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे ही खेळी यशस्वी झाली. वाघचौरे यांनी भुमरे यांचा तब्बल 13 हजार मतांनी पराभव केला. वाघचौरे यांना 64 हजार 179 मते मिळाली. तर भुमरे यांना 50 हजार 517 मते मिळाली होती. या मतदारसंघात मनसेचे उमेदवार सुनील शिंदे यांनी 24 हजार मते घेतले होते. मनसेचा थेट फटका भुमरेंना बसला होता.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भुमरे यांनी पराभवाचा उट्टा काढला. भुमरे यांनी राष्ट्रवादीचा संजय वाकचौरे यांचा तब्बल पंधरा हजार मतांनी पराभव केला. चौरंगी लढतीत भुमरेंना 66 हजार 991 मते मिळाली होती. तर वाघचौरे यांना 41 हजार 952 मते मिळाली होती. भाजपचे विनायक हिवाळे यांना 29 हजार 957 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे रविंद्र काळे यांना 24 हजार 957 मते मिळाली होती. 2019 ला संदिपान भुमरेविरुद्ध राष्ट्रवादीने उमेदवारच बदलला. शिवसेनेतून दत्तात्रय गोर्डे यांना आयात करुन उमेदवारी दिली. पण तेही पराभूत झाले. भुमरेंना 83 हजार मते मिळाली, तर गोर्डे यांना 69 हजार 403 मते मिळाली होती. वंचित आणि एमआयएमच्या उमेदवाराने येथून वीस हजाराच्या आसपास मते घेतली होती.
यावेळी लोकसभा निवडणुकीत अनेक प्रयत्नांनंतर औरंगाबाद मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहिला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी भुमरे यांना औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण त्यांचा पैठण मतदारसंघ हा जालना लोकसभेला जोडलेला आहे. भुमरे हे औरंगाबादमध्ये प्रचार करत होते. परंतु स्वतःच्या पैठण मतदारसंघात ते भाजपचे रावसाहेब दानवे यांना लीड देऊ शकले नाही. दानवे यांच्या पराभवाच पैठण हा एक विधानसभा मतदारसंघही कारणीभूत आहे. 2019 मध्ये दानवेंना इथून तब्बल 41 हजारांची आघाडी होती. यंदा काँग्रेसच्या कल्याण काळेंना पैठणमधून तब्बल 28 हजारांचे लीड मिळाले आहे. यात काळे यांना 95 हजार तर रावसाहेब दानवे यांना 67 हजार मते मिळू शकली.
आता विधानसभेला ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा या सुत्रानुसार महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटेल हे स्पष्ट आहे. पण भुमरे हे खासदार झालेले आहे. आम्ही त्यांना मदत केलेली असल्याने ही जागा आम्हाला द्यावे, असे भाजप म्हणत आहे. उमेदवारीसाठी भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे हे शिवसेनेकडून इच्छुक असून, त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे. ते रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तर जिल्हा परिषदेचे ते माजी सदस्य असून, बांधकाम व अर्थ समितीचे सभापती राहिले आहेत. तर भाजपकडून 2009 ला मनसेकडून उमेदवार राहिलेले सुनील शिंदे, तुषार शिसोदे, कल्याण गायकवाड हे इच्छुक आहेत.
महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिळेल हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात गेलेले दत्तात्रय गोर्डे हेही विधानसभेची तयारी करत आहेत. तालुकाप्रमुख मनोज पेरे पाटील हेही इच्छुक आहेत. तर संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ हे निवडणुकीची तयारी करत आहे. ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इच्छुकांची संख्या जास्त आहे.
मात्र गतवेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला होती असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सांगितले जात आहे. संजय वाघचौरे हे शरद पवार गटाकडून दावेदारी सांगत आहेत. त्यामुळे जागा वाटपात हा मतदारसंघ कळीचा मुद्दा ठरणार हे निश्चित आहे. आता यात कोणाची लॉटरी लागणार हे निकालानंतरच कळून येईल.